जळगाव लाईव्ह न्यूज । न्यायव्यवस्थेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि प्रत्येकाला योग्य कायदेशीर मार्गदर्शन सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक उद्देशाने ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम संचालित ‘न्याय विश्वास फाउंडेशन’ यांच्या वतीने रविवार, दि. २६ जुलै रोजी मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथील सभागृहात होणार आहे.

निकम कुटुंबाला वकिली क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा लाभली असून, बॅरिस्टर निकम यांनी वकिली व्यवसायासोबतच जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यानंतर पद्मश्री अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून देशभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत ॲडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम हे सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवत आहेत.

दैनंदिन जीवनात कोर्ट-कचेरी, जमिनीचे वाद, मालमत्तेचे प्रश्न, पोलीस तक्रारी, कौटुंबिक वाद किंवा विविध कायदेशीर कागदपत्रांबाबत अनेक नागरिक संभ्रमात असतात. योग्य माहितीच्या अभावामुळे अनेकदा अनावश्यक मानसिक, आर्थिक व कायदेशीर त्रास सहन करावा लागतो. हीच अडचण दूर करण्यासाठी न्याय विश्वास फाउंडेशन जळगाव अनुभवी वकिलांच्या सहभागातून हे मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे.
या मोफत शिबिरामध्ये जमिनीचे वाद, ७/१२ उताऱ्याशी संबंधित प्रश्न, मालमत्तेचे हक्क, पती-पत्नीमधील वाद, कौटुंबिक प्रकरणे, पोलीस तक्रारी, एफआयआर, न्यायालयीन प्रकरणे, सायबर गुन्हे व ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क यांसह विविध विषयांवर मोफत सल्ला दिला जाणार आहे. तसेच, आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत सरकारी कायदेशीर मदत कशी मिळू शकते, याविषयीही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
शिबिरास उपस्थित राहताना नागरिकांनी आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र, संबंधित जमिनीची कागदपत्रे, तसेच पोलीस अथवा न्यायालयीन प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत. या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन न्याय विश्वास फाउंडेशन जळगाव तर्फे करण्यात आले आहे.











