⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

मुक्ताईनगर पालिकेचा पाणीपुरवठा सुरळीत केल्याचा दावा; अनेक वॉर्ड पाण्यापासून वंचित

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । मुक्ताईनगर शहराचा पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून पाण्याच्या टाकीच्या बांधकामानिमित्त बंद ठेवला होता. तो ५रोजी सुरळीत झाल्याचा दावा नगरपंचायतीने केला. मात्र, शहरात मंगळवारी पाणीपुरवठा सुरू झाला नाही. पालिकेचा फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून यामुळे नागरिकांनी पालिकेवर संताप व्यक्त केला आहे.

मार्च महिन्यात तब्बल तीन वेळेस म्हणजेच पहिल्या टप्प्यात ८, दुसऱ्या टप्प्यात ५ दिवस आणि पुन्हा तीन दिवस अशाप्रकारे १७ ते १८ दिवस पाण्याची टाकी बांधकामासाठी मुक्ताईनगरातील पाणीपुरवठा बंद केला होता. ऐन उन्हाळ्यात कोणतीही पर्यायी व्यवस्था न करताच पालिकेने नागरिकांना तब्बल १७ ते १८ दिवस पाण्यापासून वंचित ठेवले. यामुळे तापमान चाळिशी पार असताना शहरवासीयांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागली. अनेकांना तर स्वतःची रोजंदारी सोडून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागली. मात्र, याचे सोयरसुतक नगरपंचायत प्रशासनाला नव्हते. दरम्यान, ५ एप्रिलला पहाटे साडेतीन वाजता पाणीपुरवठा सुरळीत केल्याचा दावा पालिकेने केला. प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत शहरात अनेक वॉर्ड पाण्यापासून वंचित होते.

टँकरने विकत घेतले पाणी

शहरात पुरवठ्यासाठी पालिका ज्या टाकीत पाणी साठवते, त्या टाकीचे बांधकाम सुमारे ५० वर्षांपूर्वी झाले आहे. या टाकीच्या स्लॅबला दशकभरापासून तडा गेला होता. त्यामुळे यापूर्वीच दुरुस्ती होणे अपेक्षित असताना ऐन उन्हाळ्यात हे काम करण्यात आले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. काहींवर तर टँकर पाणी विकत घेण्याची वेळ आली.