⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

चाळीसगावात मनसेने फुकले पालिका निवडणुकीचे रणशिंग

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२१ । आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात दि.7 रोजी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे पुढील दोन तीन महिन्यांमध्ये येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीची दिशा ठरवणे असा होता. नगरपालिका निवडणुकीमध्ये चाळीसगावातून जवळ-जवळ सर्व वार्डमधून मनसेचे उमेदवार संपूर्ण ताकदीनिशी उभे राहतील असे मनसे च्या वतीने सांगण्यात आले. मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ म्हणाले की आम्ही फक्त उमेदवार उभे करणार नाही तर आमचे उमेदवार निवडून कसे येतील यासाठी आमचा जोरदार प्रयत्न असेल, असं ते म्हणाले आहे.

सध्याच्या पालिकेतील कारभारावर अनिल वाघ यांनी ताशेरे ओढले. चाळीसगावात पालिकेचा ढिसाळ कारभार सुरू आहे. जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्या, धुळीची समस्या, कचऱ्याची समस्या, मार्गी लागत नाही, सत्ताधारी आणि विरोधक फक्त एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे जनतेकडे यांचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही मनसेतर्फे तरुण, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न उमेदवार उभे करून जनतेसमोर मनसे हा वेगळा पर्याय ठेवणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये चारित्र्यसंपन्न आणि तरुण उमेदवारांना मनसेतर्फे प्राधान्य राहील असेही जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी जळगाव लाईव्ह शी बोलताना सांगितले. या आढावा बैठकीत अनिल वाघ यांनी शहर प्रमुख अण्णा विसपुते तालुका अध्यक्ष संग्रामसिंग शिंदे यांचे तसेच इतर कार्यकर्त्यांचे पक्ष निष्ठेचे आणि कार्याचे कौतुक केले.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल वाघ, जिल्हा सचिव विलास बडगुजर, तालुका अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे, शहर प्रमुख अण्णा विसपुते, उपशहर प्रमुख पंकज स्वार, विभाग प्रमुख वाल्मीक पाटील, सरचिटणीस प्रवीण वझरे, प्रसिद्धीप्रमुख दीपक पवार, रस्ता आस्थापन अध्यक्ष भाईदास मराठे, वाहतूक सेना भाऊसाहेब चौधरी, दिपक चौधरी, दिलीप पवार, विद्यार्थी सेना दर्शन चौधरी पक्षप्रवेश आबा भवर, जितेंद्र देसले, बबलु महाजन, मनसे कार्यकर्ते पदाधिकारी कामगार सेना इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.