जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२६ । चाळीसगाव शहर पोलीस हद्दीत पोलिसांनी बुधवारी पहाटे विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगार आणि संशयितांविरोधात मोठी कारवाई केली. पहाटचे २ ते सकाळचे ७ वाजेपर्यंत पार पडलेल्या या मोहिमेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी, घरझडती, वॉरंट बजावणी तसेच विविध कायद्यांअंतर्गत कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत ४० सराईत गुन्हेगारांसह एकूण ४४ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच पोलिसांनी तब्बल ३९ लाख रुपये किमतीच्या ३ आलिशान गाड्या जप्त केल्या. या धडक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

खरंतर जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष मोहीम’ राबवली जात आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आज पहाटे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अचानक धडक ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले.

या कारवाईत पोलीसांनी रेकॉर्डवरील ८० आरोपी आणि गुन्हेगारांची पडताळणी करत त्यांच्या घरांची तपासणी केली. यापैकी ४४ जणांना पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
या ऑपरेशनदरम्यान शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म अॅक्ट कलम ४/२५ अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच या मोहिमेदरम्यान मुंबई पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये संशयास्पद वाटणाऱ्या ३ आलिशान कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत.यात एमएच २० ईजे ४८९० क्रमांकाची वॅगनार, एमएच १४ ईपी ७३५८ क्रमांकाची ऑडी आणि एमएच ४३ एआर ३४०९ क्रमांकाची वरना कार अशा सुमारे ३९ लाख रुपये किमतीच्या तीन वाहनांना डिटेन करण्यात आले.
याशिवाय पोलिसांनी आठ पकड वॉरंटची यशस्वी बजावणी केली. दारूबंदी कायद्याअंतर्गत तीन प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली असून कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. तसेच तीन व्यक्तींना समन्स बजावण्यात आले.
ही विशेष मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. कारवाईत एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेची पथके आणि तीन आरसीपी पथकांचा सहभाग होता.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.








