⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

मविप्र वाद : आ.गिरीश महाजनांवर दाखल गुन्ह्यात ‘त्या’ ९ संशयितांवर ‘मकोका’

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । ‘मविप्र’च्या वादातून अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी सात पानांची फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या ९ जणांवर ‘मकोका’ लावण्यात आल्यामुळे आता प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुन्ह्यातील सर्व आरोपींना ‘मकोका’ लागतो. परंतू या प्रकरणात फक्त ९ जणांना लावण्यात आला आहे आणि हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया अ‍ॅड.पाटील यांनी दिली आहे.

‘मविप्र’ संस्था काबीज करण्याच्या उद्दिष्टाने संचालकांचे राजीनामे घेण्यासाठी अ‍ॅड.विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केल्याप्रकरणी ८ डिसेंबर २०२० रोजी निंभोरा पोलीस ठाण्यात त्यांनी माजी मंत्री आ.गिरीश महाजन, सुनील झंवर यांच्यासह २९ जणांविरुद्ध फिर्याद दिली होती. नंतर हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून या गुन्ह्यात ९ संशयितांवर ‘मकोका’प्रमाणे कलम वाढविण्यात आले आहेत. दरम्यान, गुन्ह्यातील सर्व आरोपींना मकोका लावावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी अ‍ॅड.विजय भास्करराव पाटील यांनी केली आहे.

‘मविप्र’ संस्था काबीज करण्याच्या उद्दिष्टाने संचालकांचे राजीनामे घेण्यासाठी अ‍ॅड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करून त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली, अशी फिर्याद अ‍ॅड.विजय भास्कर पाटील यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी निंभोरा पोलिस ठाण्यात दिली होती. सर्वात महत्वाचे म्हणजे या फिर्यातील तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात देण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याचा आरोप देखील फिर्यादीत करण्यात आला होता. कालांतराने हा गुन्हा पुण्याच्या कोथरूड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यात २९ संशयित असून त्यापैकी तानाजी केशव भोईटे, वीरेंद्र रमेश भोईटे, जयंत फकीरराव देशमुख, जयवंत पांडुरंग येवले, भगवंतराव जगतराव देशमुख, गाेकुळ पीतांबर पाटील, बाळू गुलाबराव शिर्के, महेंद्र वसंतराव भाेईटे व शिवाजी केशव भाेईटे या नऊ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९चे कलम २३ (१) (अ) म्हणजेच ‘मकोका’प्रमाणे कलम वाढवण्यात आले आहे. दरम्यान, मकोकानुसार कारवाई केल्यानंतर संशयितांना जामीन मिळालेला असला तरी तो रद्द करून पोलिस अटक करू शकतात. या कारवाईनुसार पोलिसांना संशयितांची ३० दिवसांपर्यंत पोलिस कोठडी घेता येते.

दरम्यान, या कारवाई बाबत आ.गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच प्रतिक्रिया देत आपल्यावर ‘मकोका’ लावण्याची तयारी सुरु असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी नाव न घेता थेट एकनाथराव खडसेंच्या दिशेने इशारा केला होता. तेव्हापासून याबाबत खऱ्या अर्थाने चर्चा सुरु झाली होती. परंतू याकारवाई बाबत चित्र स्पष्ट झाले असून ९ जणांविरुद्ध मकोकाची कारवाई केली जाणार आहे.

गुन्ह्यातील सर्वांना मकोका लावावा
‘मकोका’ लावायचा असेल तर तो गुन्ह्यातील सर्व आरोपींना लावावा लागतो. त्यामुळे गुन्ह्यातील सर्व आरोपींना ‘मकोका’ लावला गेला पाहिजे होता, असे अ‍ॅड.विजय पाटील यांनी सांगितले.

अ‍ॅड.विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलिसात दिलेली फिर्याद जशीच्या तशी…
समक्ष पोलीस ठाण्यात हजर होवून फिर्याद लिहून देतो की, पुढील व्यक्तींची नावे ०१) तानाजी केशव भोईटे, रा. ए-१/ ए १००१ माणिकचंद, मलबार, कोंढवा, पुणे, ०२) निलेश रणजीत भोईटे, रा. पुणे,०३) वीरेंद्र रमेश भोईटे, मी. पो. भोईटे नगर, जळगाव, ०४) श्रीमती अलका संतोष पवार, रा. हाउसिंग सोसायटी, जळगाव, ०५) श्रीमती सुषमा गुलाबराव इंगळे, रा. शिवाजीनगर, मु. पो. तालुका, यावल, जि. जळगाव, ०६) विजया धर्मराज यादव रा. आर के नगर, मू. पो. ता. अमळनेर, जिल्हा, जळगाव,०७) जयंत फकीरराव देशमुख, रा. हत्ती बिल्डिंग, देशमुख गल्ली, मु. पो. ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव, ०८) निळकंठ शंकर काटकर, रा. नगरदेवळा, ता. जि. जळगाव, ०९) जयवंत पांडुरंग येवले, रा. शिवाजी नगर, मु. पो. ता. यावल, जिल्हा जळगाव, १०) परमानंद दंगल साठे, रा. चिंचोली, ता. यावल, जि. जळगाव, ११) भगवंतराव जगतराव देशमुख, रा.वरणगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव, १२) गोकुळ पितांबर पाटील, रा. भादली, पो. कठोर ता. जि. जळगाव, १३) शंकरराव माणिकराव शिंदे, रा. मू. पो. तरसोद, ता. जि. जळगाव, १४) सुभाष रामचंद्र पाटील रा. पिंप्री बु, ता. एरंडोल, जि. जळगाव, १५) सुनील भाऊसाहेब भोईटे, रा. संभाजी पेठ, मु. पो. ता. यावल, जि. जळगाव, १६) कुंडलिक यादव पाटील रा. कामतवाडी, ता. अमळनेर, जि. जळगाव, १७) एकनाथ फत्तु पाटील, रा. मोरगाव, ता. रावेर, जि. जळगाव, १८) किशोर जयवंतराव काळे, रा. हनुमान कॉलनी, जळगाव, १९) बाळू गुलाबराव शिर्के, रा. बोरावल, गेट, मु, पो. ता. जि. जळगाव, २०) जयवंत बाबुराव भोईटे रा. विठ्ठल पार्क, मुक्ताईनगर, जळगाव, २१) शिवाजी त्र्यंबकराव घुले, रा. कळमसरे, ता. पाचोरा, जि. जळगाव, २२) पितांबर शेनफळू पाटील, रा. मानराज पार्क, जळगाव, २३) शीला मधुकर मराठे, रा. रवंजे, बु, ता. एरंडोल, जिल्हा जळगाव, २४) महेंद्र वसंतराव भोईटे, रा. कोल्हे नगर, जळगाव, २५) निलेश भोईटे यांचा हस्तक सुनील गायकवाड, २६) शिवाजी केशव भोईटे रा. पुणे, २७) सुनिल देवकीनंदन झंवर, रा. जळगाव, २८) गिरीश दत्तात्रय महाजन, रा. जामनेर, २९) रामेश्वर नाईक, रा. मुंबई, व तपासात निष्पन्न होणारे सर्व व्यक्ती ज्यांनी गुन्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करून त्यांनी पदाचा व अधिकाराचा गैरवापर व दुरुपयोग केला अशा सर्व व्यक्ती महाशय पोलीस निरीक्षक साहेब जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित, जळगाव ही संस्था सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत संस्था असून विश्वस्त कायद्यान्वये सुद्धा नोंदणीकृत आहे. jalgaonlive.news परंतु संस्थेची निवडणूक व कामकाज सहकार कायद्यानुसार चालते. सदर संस्थेचे एकूण 28 माध्यमिक शाळा, दहा किमान कौशल्य महाविद्यालय, 10 जुनियर कॉलेज, एक डी एड कॉलेज, एक प्रायमरी स्कूल, तीन सीनियर कॉलेज असून या संस्थेची सर्व मालमत्ता जवळपास एक हजार कोटी रुपये आहे.

दिनांक १७/२/११ रोजी जळगाव, वरणगाव, यावल या तीन सीनियर कॉलेज वर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी सन 2011 चे संचालक मंडळाचा गैरकारभार व गैरवर्तनुकी बाबत सविस्तर अहवाल उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांकडे सादर केला होता. उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांनी महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने दिनांक १६/६/२०१२ रोजी जळगाव, वरणगाव, यावर या तीन सीनियर कॉलेज वर प्रशासक नेमले. जळगाव येथे उच्च शिक्षण उपसंचालक श्री. डॉ. ए. बी साळी, श्री डॉ. बी. एस ठोंबरे, अधिव्याख्याता शासकीय अध्यापक विद्यालय, बुलढाणा हे वरणगाव येथे तर यावल येथे श्री. डॉ. आर. बी. मानेकर, प्राचार्य शासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलढाणा यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या तिघांनी दिनांक. २१/०६/२०१२ रोजी व दिनांक. २५/०६/२०१६ रोजी कॉलेजचा पदभार स्वीकारला होता.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था, जळगाव या संस्थेचे संचालक हे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी दि. २३/१२/२०११ रोजी बरखास्त केले. सदरच्या आदेश दि. २८/०५/१२ रोजी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी कायम केले. सदरच्या आदेशास मा. सहकार मंत्र्याकडे आव्हान दिले. परंतु दि. १७/०७/१२ रोजी मा. सहकार मंत्र्यांनी वरील दोन्ही आदेश कायम करून संस्थेचा रिव्हिजन अर्ज फेटाळला. जिल्हा उपनिबंधकानी नियुक्त केलेल्या तीन शासकीय प्रशासक मंडळाने पोलिसांसमक्ष संस्थेचा ताबा दि. १८/०७/१२ रोजी घेतला व तसा पंचनामा केला. सदर मंडळात तालुका उपनिबंधक जिल्हा, जळगाव चे श्री. निळकंठ ज्ञानदेव करे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पाचोरा चे श्री के पी पाटील तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, भडगाव चे श्री. जी. एच पाटील यांचा समावेश होता. सदर प्रशासकीय मंडळाने आपले कामकाज दि. १८/०७/२०१२ रोजी सुरू करून याबाबत त्यांनी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना पदभार स्वीकारल्याचे कळविले होते.

श्री. निळकंठ करे यांचे बदलीमुळे त्यांचे ऐवजी श्री. एस डी पाटील जिल्हा विशेष लेखापरीक्षक यांचेकडे पदभार दिल्याचे जिल्हा उपनिबंधक यांनी आदेश काढले, व पाटील यांनी करे यांचेकडून पदभार स्वीकारला. श्री. एम. डी. पाटील यांच्यानंतर श्री. एन. डी. गाधेकर यांची सदर संस्थेवर प्रशासक म्हणून नियुक्ती जिल्हा उपनिबंधक काढणी केली. श्री गाधेकर यांनी सदर संस्थेची निवडणूक घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (सहकार) ने निवडणूक पार पाडण्यासाठी मतदारांची यादी तयार केली. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग (सहकार) ने निवडणूक पार पाडण्यासाठी मतदारांची यादी तयार केली. सदर अंतिम मतदार यादीत वरील सर्व आरोपींचे सदस्य नसल्याने त्यांचे नाव मतदार म्हणून नाव मतदार यादीत नव्हते. महाराष्ट्र निवडणूक आयोग (सहकार) ने दि. १०/०५/१५ रोजी सदस्य संस्थेची निवडणूक घेवुन दि. ११/०५/२०१५ रोजी निकाल घोषित केला व दि. १५/०५/२०१५ रोजी नरेंद्र भास्करराव पाटील (मयत), श्री. विजय भास्करराव पाटील व इतर १८ या व्यक्ती निवडून आल्याचे घोषित केले व त्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध केले. निवडून आलेल्या संचालकांमधून चेअरमनची निवडणूक दि. २२/०५/२०१५ रोजी झाली. त्याच दिवशी म्हणजे दि. २२/०५/२०१५ रोजी श्री. एन. डी. गाधेकर यांनी संस्थेचा कारभार चेअरमन नरेंद्र पाटील (मयत) यांचेकडे कारभार सुपूर्त केला. तसेच तीन सीनियर कॉलेजच्या स्वतंत्र प्रशासकांनी सुद्धा त्यांचा कालावधी संपल्यानंतर दि. २०/०९/२०१६ रोजी श्री. साळी यांनी चेअरमन नरेंद्र पाटील (मयत) यांच्याकडे कारभार सुपूर्त केला. तसेच दि. १७/०९/२०१६ रोजी श्री. मानेकर व श्री. ठोंबरे यांनी चेअरमन नरेंद्र पाटील (मयत) यांचेकडे त्यांचा कारभार सुपूर्त केला. jalgaonlive.news यानंतर चेअरमन नरेंद्र पाटील यांचेकडे संस्थेचा चार्ज देऊन तसा दस्त केला व शासकीय यंत्रनेला कळविले. निवडून आले बाबतचे चेंज रिपोर्ट २०१५ मध्येच सहाय्यक धर्मदाय आयुक्त, जळगाव यांचेकडेस दाखल केले.

नरेंद्र पाटील (मयत) त्यांचे संचालक मंडळ (विश्वस्त) हे चार्ज घेतल्यापासून संपूर्ण संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहत होते. सचिन सांगळे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे वेळेस संस्थेत येवुन सर्व संचालकांना मार्गदर्शन केले होते. अप्पर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनीसुद्धा संस्थेत येवुन एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी व नरेंद्र पाटील यांच्या विनंतीवरून त्या आल्या होत्या. प्रशासकांनी व चेअरमन नरेंद्र पाटील (मयत) यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव शिक्षणअधिकारी (माध्यमिक) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव, जे डी सी सी, बँक इत्यादी ठिकाणी संस्था व शिक्षकांच्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे.

जानेवारी 2018 च्या पहिल्या आठवड्यात संस्थेच्या कार्यालयात मी संस्थेचे कामकाज पाहत असताना निलेश रणजीत भोईटे आला व त्याने मला संस्थेचे माजी सचिव तानाजी भोईटे यांनी आपणास पुणे येथे बोलविले आहे, संस्थेचे जुने रेकॉर्ड ते देणार असून ते आपण घेऊन जावे असे म्हणून तानाजीच्या फ्लॅटचा पत्ता व फोन नंबर दिला. तानाजी भोईटे यांना जळगाव येथे येण्यास मनाई आहे हे आपणास माहीत आहे. तसेच संस्थेविषयी सुद्धा तानाजी भोईटे यांना नरेंद्र पाटील यांच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले. सदरची बाब मी माझे भाऊ नरेंद्र पाटील यांच्याशी बोललो. नरेंद्र पाटील यांनी संचालकांशी फोनवर चर्चा करून मला संचालक महेश आनंदा पाटील यांना प्राधिकृत करून दप्तर घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार लगेच एक दोन दिवसात तानाजीला फोन करून आम्ही पुणे येथे जाण्यासाठी स्वतःच्या मारुती स्विफ्ट डिझायर (एम.एच 20 डिएन 0990) या कारने सकाळी जळगाव तिथून निघालो, दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुणे येथे पोहोचलो. तानाजी भोईटे यांना फोन करून पुण्याला पोहोचल्याचे सांगितले असता तानाजी भोईटे याने कोथरूड येथील दशभुजा पुढे पेट्रोलियम पंपाचे समोरील हॉटेल किमया येथे येण्यास सांगितले.

आम्ही तेथे पोहोचल्यावर हॉटेलच्या बाहेर निलेश भोईटे उभा होता. तो आम्हाला हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेला तेथे विरेंद्र भोईटे, तानाजी भोईटे, शिवाजी भोईटे व रामेश्वर नाईक हजर होते. रामेश्वर नाईक यांनी तानाजीला आपला विषय सांगा म्हणून सांगितले. त्यावर तानाजीने मला उद्देशून सांगितले की, सदरची संस्था गिरीशभाऊला हवी आहे. आमच्या ताब्यात संस्था देऊन टाका. भाऊ एक कोटी देण्यास तयार आहेत. मी व महेश त्यांना स्पष्ट नकार दिला. मी त्यांना संस्थेची दप्तर कुठे आहे? म्हणून विचारले असता निलेश भोईटेने गिरीशला व्हाट्सअपवर व्हिडिओ कॉल लावला व कॉल लावल्यावर अ‍ॅड.विजय पाटलांशी बोला म्हणून सांगितले. गिरीशने मला सांगितले की, तू सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था निलेशच्या ताब्यात देऊन विषय संपून टाक. मी असे होणार नाही, असे म्हणून त्यास नकार दिला. मी व महेश उठण्याचा प्रयत्न करू लागताच तानाजी भोईटेने नाराज होऊ नका, चला तुम्हाला रेकॉर्ड देतो, त्यावर ठीक आहे असे म्हणून मी व महेश उठलो. त्यानंतर आमच्या मागे विरेंद्र तानाजी, निलेश शिवाजी व रामेश्वर आले. हॉटेलच्या बाहेर आमच्या मारुती स्विफ्ट गाडी जवळ आल्यावर विरेंद्रने माझ्या गाडीची चावी निलेश द्यायला सांगितली. तुम्हाला रस्ते करणार नाही म्हणूत माझ्याकडून आमच्या गाडीची चावी घेतली आणि मला व महेशला स्कोडा (एमएच 14 6000) या गाडीच्या मागच्या सीटवर बसण्यास सांगितले. मी महेश व वीरेंद्र मागे बसलो व रामेश्वर पुढे बसला. शिवाजी भोईटे हा निलेश सोबत आला. तानाजीने निलेशला माझी गाडी घेऊन सदाशिव पेठेतील अपार्टमेंट येण्यास सांगितले. तानाजीने गाडी काढली व आमच्या मागे निलेश माझी गाडी घेऊन येऊ लागला व ते सर्व एका फ्लॅटवर आम्हाला घेऊन गेले. तेथे अगोदरच जयवंत भोईटे, नीलकंठ काटकर, गणेश कोळी उर्फ गणेश मेंबर, सुनील झंवर, विराज भोईटे होते. या व्यक्ती तानाजी भोईटे व निलेश भोईटे यांचे नातेवाईक असल्यामुळे व ते जळगावचे राहणार असल्यामुळे मी त्यांना ओळखतो. नीलकंठ काटकर हा प्राचार्य देशमुखचा सासरा असल्यामुळे मी ओळखतो. आमच्या मागोमाग निलेश भोईटे आला व त्याने बंद दरवाजा करून घेतला. यावेळी लगेचच रामेश्वरने मला डोक्याच्या मागच्या बाजूने जोरात चापट मारली व माझ्या मानेवर चाकू लावून मुकाट्याने बसून राहा अन्यथा ठार करून टाकू अशी धमकी दिली व महेशला सुद्धा परमेश्‍वरी मुकाट्याने बसण्यास सांगितले.

आम्ही दोन्ही हा प्रकार पाहून भयभीत झालो. त्यानंतर रामेश्वरने मानेला लावलेला चाकू पोटाला लावला. सुनील झंवर हॉलमध्ये मला दम देऊ लागला व संस्था सोडून द्या मुकाट्याने, सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन निलेशकडे देऊन टाक, अन्यथा परिणाम वाईट होतील. गिरीश भाऊंनी यांना बसविले आहे, हे तुला माहीत नाही का?. गिरीशभाऊचा खास माणूस आहे. यावेळी विरेंद्र भोईटेने मला पायावर लाथ मारली व नरेंद्रला सांग सर्व संचालकांचे राजीनामे द्या, रामेश्वरने पुन्हा माझ्या कानशिलात मारली व हरामखोर, भडव्या असा तयार होणार नाही, याला एमपीडीए लावू व निलेशला सांगितले की, महेंद्र बागुलला फोन लाव व त्यांना एमपीडीएचा अर्ज तयार करायला सांग. निलेशने मी लगेच फोन लावतो व फोन स्पीकरवर लावला होता. jalgaonlive.news फोन लावल्यावर तिकडची व्यक्ती बोलला की, निलेशभाऊ… विजय पाटील मानला का संस्था द्यायला?, त्यावर निलेश नाही आता सुनीलभाऊच्या फ्लॅटवर आणले आहे, दोघे आमच्या ताब्यात आहे. रामेश्वर म्हणतो की, विजू पाटील व त्याच्या भावांना एमपीडीए लावून टाकू. समोरचा व्यक्ती बोलला की, तुम्ही संस्थेतील कर्मचाऱ्यांना मोक्का लावण्याचे अर्ज करायला सांगा. तुम्ही गिरीशभाऊ मार्फत मंत्रालयातून फक्त ट्रस्टचे संचालक ग्राह्य धरावे, असे पत्र घेऊन या. ते तुम्हाला संस्था चालवायला देतील. तू अगोदर मागच्या महिन्यात तुझे लोक निवडून आल्याचे दाखव व चेंज रिपोर्ट दाखल करून ठेव ठीक आहे, असं म्हणून निलेश फोन ठेवला.

आम्ही दोघे अत्यंत भयभीत झालो. रामेश्वर व विरेंद्रने माझे व महेश पॅन्ट व शर्ट काढून घेतले व आम्हाला एका बेडरुममध्ये रात्रभर हात-पाय बांधून डांबून ठेवले. आम्ही आरडाओरडा करू नये म्हणून विरेंद्र व निलेश आमच्या रूममध्ये थांबले व शिवाजी भोईटे, नीलकंठ काटकर व रामेश्वर हे अधून-मधून येऊन पाहत होते. ते दुसऱ्या दिवशी सकाळी निलेश व विरेंद्र, निळकंठ काटकर, शिवाजी भोईटे आम्हाला लाथांनी मारहाण केली व कुठेही तक्रार केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था सोडून दे अन्यथा जग पाहणार नाही, म्हणून तानाजी भोईटे आम्हाला धमकी दिली. मी त्यांना जिवाच्या भीतीने संस्थेच्या संचालकांचे राजीनामे घेऊन निलेशच्या ताब्यात राजीनामे व संस्था देतो…तुम्हाला पुढे संस्था कोणाला द्यायची ती देऊन टाका, असे सांगितल्यावर सूनील झंवरने आमचे कपडे अंगावर फेकले व धमकावून सांगितले की, कपडे घाला व मुकाट्याने निघा. आठ दिवसात राजीनामे निलेशकडे पोहोचले पाहिजे, असे ओरडून सांगितले. त्यावर मी घाबरून होकार देऊन कपडे घालून निघून जळगावला आलो. मी व महेश पूर्णपणे घाबरलेलो होतो व झालेला प्रकार कोणालाही सांगायचं नाही, असे ठरवून आम्ही सायंकाळी जळगावला पोहोचलो. दुसऱ्या दिवशी माझे भाऊ नरेंद्र पाटील यांनी संस्थेचे रेकॉर्ड तानाजी दिले का? याबद्दल विचारले…त्यावर मी तानाजी रेकॉर्ड वीस-पंचवीस दिवसात देणार आहे, त्यांना अर्जंट बाहेरगावी जायचे आहे असे म्हणून टाळले. तानाजी भोईटे, निलेश भोईटे, शिवाजी भोईटे हे पुण्यावरून व विरेंद्र भोईटे, सुनील झंवर हे जळगाव येथून पूर्वनियोजित कट अनुसार हालचाली करीत होते.

पुणे येथे जानेवारी 2018 मध्ये मला व महेश ला दिलेल्या धमकीच्या अनुषंगाने मी राजीनामे व संस्था गिरीशचा हस्तक तानाजी भोईटे, निलेश भोईटे व इतरांच्या ताब्यात न दिल्यामुळे 17 फेब्रुवारी 2018 पासून 313 दिवस पोलीस संस्थेत बसवून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. 17 फेब्रुवारी 2018 रोजी सुनील गायकवाड. महेंद्र बागुल व इतरांच्या मदतीने निलेश भोईटे, विरेंद्र भोईटे इत्यादींनी संस्थेत येऊन संस्थेची कार्यालय दरवाजे तोडले. सोबत कुऱ्हाडी आणल्या होत्या. संस्थेतील मूल्यवान रेकॉर्ड घेऊन गेले होते व संस्थेतील कर्मचारी यांच्या खिशातील 5 हजार रुपये तसेच दोन तोळ्याचे चैन सुद्धा तोडून घेतली. संस्थेच्या चाव्या जबरदस्ती हिसकावून घेतल्या. सदरची घटना ही माझ्यासोबत तानाजी भोईटे. रामेश्वर इत्यादींनी जानेवारी २०१८ मध्ये पुणे येथे केलेले अत्याचाराचाच एक भाग होता. 17 फेब्रुवारी 2018 रोजी घटनेबाबत पराग कदमने अनेक तक्रार देऊनही कोणतीही कारवाई केली नाही. याबाबत सविस्तर अर्ज केला त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. या घटनेनंतर महेंद्र बागुल. सुनील गायकवाड व इतर आरोपींचा त्रास वाढतच गेला. नरेंद्र पाटील व मी व इतर संचालक वेळोवेळी आम्हाला संस्थेत जाण्यापासून मज्जाव करण्याचे थांबवा, असे सांगत होते. परंतु सदरच्या व्यक्ती तुम्ही परवानगी आणा तरच संस्थेत जाऊ देऊ नाहीतर तुमचे सर्व संचालकांचे राजीनामे घेऊन या, असे ज्यावेळेस भेटावयास गेलो निवेदन देण्यास गेलो, महेंद्र बागुल व सुनील गायकवाड यांनी ज्यावेळी बोलवले त्यावेळेस धमकावून सांगितले.

गायकवाडने मला व भाऊ नरेंद्र पाटील यांना मानसिक त्रास दिला महेंद्र गायकवाड यांनी आमच्यावर धमकावून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली तसेच खाली मला व माझ्या भावांना अडकवण्याची धमकी 30 मार्च 2018 ला बोलावून दोघांनी माझ्याकडून दोन लाख रुपयाची खंडणीची मागणी सुद्धा केली. व सांगेल तेथे त्या दिवशी पैसे आणून द्यायचे दोन लाखाची व्यवस्था करून ठेवा अन्यथा एक वर्षासाठी एमपीडीए अर्थात स्थानबद्ध व्हा. आम्ही अत्यंत घाबरलेलो असल्याने भीतीपोटी होकार दिला व 31 मार्च 2018 रोजी अकोला जनता बँक खाते क्रमांक 20 3301 / 183 मधून दोन लाख काढून ठेवले. दिनांक 2 एप्रिल 2018 रोजी महेंद्र बागुल याने मला फोन करून दोन लाख तयार आहेत ना? म्हणून विचारले. मी हो म्हटल्यावर त्याने औरंगाबादला गायकवाडकडे पैसे घेऊन या असे सांगितले. त्यावर बोललो की औरंगाबाद रस्त्याचे काम चालू आहे. मला चाळीसगावमार्गे जावे लागेल व चाळीसगाव जळगाव रस्त्याचे काँक्रिटीकरणनाचे काम चालू आहे, त्यावर मी लगेच औरंगाबादला जाणे शक्य होणार नाही, लगेच महेंद्रने गायकवाडला फोन लावला व त्यांनी पुणे येथे उद्या पाठवून देण्याचे सांगितले. मी पुणे येथे कुठे जायचे असे विचारले असता, तुला उद्या दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत कळवतो असे सांगितले. मी दुसऱ्या दिवशी 3 एप्रिल 2018 रोजी सकाळी चार वाजता जळगाव येथून पुणे येथे ते दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास पोहोचलो. याच दरम्यानमध्ये महिंद्र मला फोनवर कोथरूड रस्त्यावरील उड्डाणपुला शेजारी असलेल्या दशभुजा गणपती मंदिराजवळ थांबण्यास सांगितले.

दुपारी दोन वाजेच्या सुमारास मी माझ्या गाडीत मंदिराजवळ थांबलो होतो, त्यावेळी सुनील गायकवाड रिक्षाने येऊन माझ्या जवळ रिक्षा थांबवली व रिक्षातून उतरून पैशांची मागणी केली. मी दोन लाखची पिशवी गायकवाडला दिली. त्याने पिशवी पैसे असल्याची खात्री करून रिक्षात बसून काही न बोलता निघून गेला. त्यानंतर 30 जून 2018 रोजी गायकवाड व महेंद्र यांनी सायंकाळी मला व भाऊ नरेंद्र यांना महिंद्राच्या मोबाईल वरून फोन करून बोलावून घेतले व आम्हाला दोघांनी सांगितले की, संस्था सोडा नाहीतर दोन तीन दिवसात तुम्ही दोघे दिसणार नाही. तसेच तुम्हाला व तुमच्या भावनांना एमपीडीए खाली वर्षभर स्थानबद्ध करून टाकू, अशी धमकी पुन्हा दिली. 4 जुलैला सकाळी दहा वाजता माझ्याकडे सर्व संचालकांचे राजीनामे हवेत म्हणून धमकावले. तुम्ही दोन लाख रुपये घेऊ नये आम्हाला का त्रास देत आहात? असे विचारले असता सुनील गायकवाड हा महेंद्र बागुलला बोलला की, हा जास्त बोलतो याचा व याच्या भाऊचा एमपीडीएचा प्रस्ताव तयारकर यावर मी व माझा हात जोडून विनवण्या करू लागलो. चूक झाली म्हणून माफी मागू लागलो. 4 जुलैला राजीनामे घेऊन आणून देतो असे मी सांगितले. या घटनेचा भाऊ नरेंद्र पाटील यांना फार मोठा मानसिक धक्का बसला व ते 2 जुलै 2018 रोजी चक्कर येऊन पडले. त्यात त्यांच्या मानेचा मनका तुटून मज्जारज्जूला दुखापत झाली. jalgaonlive.news त्यांची प्रकृतीची गंभीर परिस्थिती पाहता त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविले. प्रकरण चिघळू नये म्हणून मी कोणतीही तक्रार पोलिसात वरिष्ठांकडे करू नये, म्हणून सुनील झंवरमार्फत मोबाईल वरून फोन करून प्रयत्न सुरू केले. सुनीलने मला त्याचे पुणे येथील पत्ता मोबाईलवर पाठवून तेथे मिटिंग करायला बोलावले. कुठे तक्रार करू नका. चर्चेतून विषय संपून जाईल, असे झंवरने सांगितले. त्यानुसार मी 4 जुलैला दिलेल्या पत्त्यावर गेलो असता मला दाबून ठेवलेला फ्लॅट हाच असल्याचे माझ्या लक्षात आले.

भाऊ नरेंद्र पाटील यांची प्रकृती सुधारली नाही, त्यांचे पुण्यातील रुबी हॉल येथे ऑपरेशन झाले. परंतु ते दिनांक 29 जुलै 2018 ला पुणे येथे मयत झाले. भावाच्या मृत्यूने मी पूर्णपणे खचून गेलो होतो. जळगावात पूर्णपणे गुंडशाही सुरू होती व दहशतीचे वातावरण होते शेवटी तानाजी भोईटे व त्याचे हस्तक निलेश भोईटे ( तानाजी भोईटे यांचा पुतण्या), वीरेंद्र भोईटे ( तानाजी भोईटे चा चुलत भाऊ), श्रीमती अलका संतोष पवार (निलेश भोईटे च्या मामाची पत्नी), श्रीमती सुषमा गुलाबराव इंगळे ( तानाजी भोईटे ची नातेवाईक), विजय धर्मा यादव (तानाजी भोईटे चे नातेवाईक), निळकंठ शंकर काटकर (तानाजी भोईटे चे आत्याचे पती), जयंत पांडुरंग येवले ( तानाजी भोईटे चा नातेवाईक), बाळू गुलाबराव शिर्के (तानाजी भोईटे चा नातेवाईक), जयवंत बाबुराव भोईटे (तानाजी भोईटे चा चुलत भाऊ), भगवंतराव जगतराव देशमुख (तानाजी भोईटे चुलत सासरे), सुनील भाऊसाहेब भोईटे (तानाजी भोईटे चे नातेवाईक), शंकरराव माणिकराव शिंदे (तानाजी भोईटे चा नातेवाईक), महेंद्र वसंतराव भोईटे (तानाजी भोईटे चा चुलत भाऊ), जयंत फकीरराव देशमुख (तानाजी भोईटे चा नातेवाईक), शिवाजी त्र्यंबकराव घुले ( तानाजी भोईटे चा नातेवाईक), परमानंद दंगल साठे (तानाजी भोईटे चा मित्र), गोकुळ पितांबर पाटील, सुभाष रामचंद्र पाटील, पुंडलिक यादव पाटील, एकनाथ फत्तु पाटील (संस्थेतील जूनियर कॉलेजमधील शिक्षकांचे वडील), किशोर जयवंतराव काळे (संस्थेतील कॉलेजमधील क्लर्क चा भाऊ व तानाजी भोईटे चा मित्र), पितांबर शेनफळू पाटील (संस्थेतील निवृत्त मुख्याध्यापक), शीला मधुकर मराठी यांनी गुंडशाहीने संस्थेचा ताबा घेतला. उपरोक्त आरोपी हे संस्थेचे सभासद तसेच मतदारही नाही या आरोपींविरुद्ध अनेक खंडणीचे व पैसे उघडण्याचे गुन्हे दाखल असून अशा सततच्या गुन्हेगारी कृत्यातून आरोपींनी प्रचंड अवैध मालमत्ता जमा केलेली आहे. तीनही कॉलेज प्रशासकांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यावर संस्थेचे चेअरमन नरेंद्र पाटील यांचेकडेस चार्ज सोपविण्याचे माहित होते. व त्यांनी मा. हायकोर्टात शपथपत्र दाखल केले होते. वरील सर्व घटना हा सुसूत्र योजना रचून केलेल्या आहेत.

निलेश भोईटे यांनी त्याचे मोबाईल वरून मला फोन करून धमकी दिली की, मी व वीरेंद्र भोईटे पुण्यात असून तू लवकरात लवकर तीन लाख रुपयांची व्यवस्था कर व पुणे येथे पैसे घेऊन ये. अन्यथा गिरीश महाजन आमचे सोबत असून तुला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून कायमचे जेलमध्ये सडवतो अशी धमकी निलेश भोईटेने दिली. व सांगितले की, मागील वेळेस कोथरूड येथील जा किमया हॉटेलमध्ये तू व महेश आला होता. त्याच हॉटेलमध्ये पैसे लवकरात लवकर घेऊन ये.

दिनांक 29/3/2019 ला बँकेतून तीन लाख रुपये कॅश काढून दिनांक 30/3/ 2019 रोजी सकाळी मी जळगाव येथून गाडीने निघून निलेश भोईटे यास पुणे येथे पोहोचण्यापूर्वी फोन लावून सांगितले की, मी पुणे येथे दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत पोहोचेल. तेव्हा निलेश भोईटे यांनी सांगितले की, किमया हॉटेलमध्ये आल्यावर वरच्या मजल्यावर ये तेथे आम्ही आहोत.

मी दुपारी तीन वाजता कोथरूड येथील हॉटेल किमया येथे पोहचलो त्यावेळी हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील एका टेबलावर निलेश भोईटे व वीरेंद्र भोईटे हे बसलेले होते. त्यावेळी निलेश भोईटे व वीरेंद्र भोईटे यांनी मला विचारले कि, पैसे आणले आहेत का… त्यावेळी मी हो म्हटले तेव्हा त्यांनी सांगितले की, तू पैसे देते त्यावेळी मी मी पैशांची पिशवी निलेश जवळ दिली. व त्या दोघांनी त्यात पैसे असल्याची खात्री करून मला इथून लवकर निघून असे सांगितले. तरीही निलेश भोईटे याने मारवड पोलीस स्टेशन ता. अमळनेर येथील अधिकार्‍यांवर दबाव टाकून खोटा गुन्हा दिनांक 29/6/2019 रोजी गुन्हा रजी नंबर 26 /2019 माझेवर व पाच व्यक्तींवर दाखल केला. परंतु नंतर सदरचा गुन्हा समरी करण्यात आला.