अखेर तो क्षण आला! मान्सून राज्यात दाखल; लवकरच संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार

जून 6, 2026 4:31 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जून २०२६ । गेल्या अनेक महिन्यांपासून कडक उन्हाळा आणि तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. संपूर्ण राज्य ज्या क्षणाची चातकासारखी वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला असून मान्सून महाराष्ट्रात अधिकृतपणे दाखल झाला आहे. केरळ आणि गोव्यात हजेरी लावल्यानंतर मान्सूनने आता महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले आहे.

monsoon

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या दक्षिण भागात दिमाखात प्रवेश केला आहे. या बातमीमुळे राज्यातील बळीराजाच्या आनंदात दुप्पट वाढ झाली असून शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.

मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले होते. अखेर अरबी समुद्रावरून प्रगती करत मान्सूनने महाराष्ट्रात धडक दिली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत (दोन दिवसांत) मान्सून आणखी पुढे सरकणार असून राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही तो सक्रिय होईल. सध्या कोकण आणि कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भागात जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’!
मान्सूनच्या आगमनामुळे हवामान खात्याने ६ जून रोजी राज्यातील कोकणापासून ते थेट विदर्भापर्यंतच्या तब्बल २५ जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण!

मान्सूनच्या आगमनामुळे राज्यातील ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. यंदा वेळेवर पाऊस पडणार असल्याने सुगीचे दिवस येणार असल्याची चाहूल लागली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वमशागतीची कामे आटोपली आहेत, त्यांनी आता पेरणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, हवामान खात्याने पुरेशा पावसाची खात्री करूनच पेरणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now