लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जून महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात

जुलै 15, 2026 3:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचे पैसे पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या मोबाईलवर १५०० रुपये जमा झाल्याचे संदेश (मेसेज) धडकू लागल्याने आनंदाचे वातावरण आहे.

ladki bahin yojana

मात्र, याच वेळी सरकारने एक मोठी कारवाई करत राज्यभरातील तब्बल ९२ लाख अपात्र तसेच ई-केवायसी (e-KYC) न करणाऱ्या महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली आहेत. महिला व बालविकास विभाग आणि ‘नारीशक्ती दूत’ ॲपच्या अधिकृत डेटा पडताळणीनंतर ही मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

केवळ १ कोटी ४० लाख महिलांनाच लाभ

योजना सुरू झाली तेव्हा यासाठी २ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते. विविध टप्प्यांवरील छाननीनंतर हा आकडा २ कोटी ३० लाखांच्या आसपास पोहोचला होता. मात्र, संपूर्ण तांत्रिक निकष आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या केवळ १ कोटी ३८ लाख ते १ कोटी ४० लाख महिलांनाच प्रत्यक्षात लाभ दिला जात आहे. उर्वरित सुमारे ९२ लाख संशयास्पद किंवा अपूर्ण अर्ज प्रक्रियेतून बाजूला ठेवण्यात आले आहेत.

अजूनही महिला वगळल्या जाण्याची शक्यता?

यादीतून नावे कमी होण्याच्या मुख्य कारणांमध्ये अपूर्ण ई-केवायसी, बँक खात्याशी आधार लिंक नसणे, एकाच महिलेने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून केलेले दुहेरी अर्ज आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणे यांचा समावेश आहे. आगामी काळातही ज्या महिला आपली बँक खाती आधारशी जोडणार नाहीत किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त आढळेल, अशा महिलांची नावे टप्प्याटप्प्याने कमी केली जाऊ शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now