जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक झटका दिला आहे. महामंडळाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून १३.५६ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या भाडेवाढीमुळे साध्या बसचे पहिल्या टप्प्यासाठीचे दर १०.०५ वरून १५ रुपयांवर, तर शिवनेरी एसी स्लीपरचे दर २५.३५ रुपयांवरून ३० रुपयांवर पोहचले आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागाची तारणहार असलेल्या ‘लालपरी’सह वातानुकूलित ‘शिवनेरी’चा प्रवासही महागला आहे.

महामंडळाने यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये भाडेवाढ केली होती. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत एसटीचा तोटा वाढला एसटीची आर्थिक स्थिती गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक बिघडली आहे. जून २०२५ मध्ये प्रतिकिलोमीटर उत्पन्नामागे ३.५१ रुपयांचा तोटा होता. तो जून २०२६ मध्ये तब्बल २.१८ रुपयांनी वाढून ५.६९ रुपयांवर पोहचला आहे. यापूर्वी १० टक्के हंगामी भाडेवाढ करूनही अपेक्षित महसूल वाढ न झाल्याने महामंडळाचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले. त्यामुळे पुन्हा भाडेवाढ करून वाढत्या खर्चाचा बोजा प्रवाशांवर टाकला जात असल्याची टीका प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.











