⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

स्व. विठ्ठल हिरणवाळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मीडिया व्याख्यानमाला

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । समाजात आज सर्वत्र नकारात्मकता वाढीस लागली असतांना वृत्तांकन करतांना एका समुपदेशकाची भूमिका निभविणे गरजेचे आहे. त्यासाठी आजच्या वर्तमानपत्रांनी भविष्यपत्रे बनून  समाजमन सशक्त बनविण्यासाठी तसेच भविष्यातील सुदृढ, निरोगी, निर्भय, व्यसनमुक्त आणि मूल्यनिष्ठ समाज निर्मितीसाठी वृत्तांकन करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.

स्व. विठ्ठल हिरणवाळे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मीडिया व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. त्यात प्रथम पुष्प गुंफतांना  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी वर्तमानपत्रांनी भविष्यपत्र बनण्याची गरज या विषयावर व्याख्यान दिले. ते पुढे म्हणाले की, लोकशाहीचा मजबूत स्तंभ असलेल्या वृत्तपत्रांनी एक जागरुक घटक म्हणून नेहमी चांगले कार्य केले आहे. 

सध्याच्या अनिश्चतेच्या काळात मानवीमन नकारात्मक बाजूने जास्त झुकत चालले आहे. अशा परिस्थितीत वर्तमानपत्रांनी समुपदेशकाची भूमिका करण्याची आवश्यकता आहे. लोकांना वस्तुस्थितीची माहिती देत असतांना भयभीत न करता निर्भयतेचा आणि आश्वासक असे संतुलित वृत्तांकन करुन भविष्यातील सुदृढ समाज घडविण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे.

नारदाबरोबर संजयची भूमिका करावी :

नारदास आद्य पत्रकार मानतात. तीन लोकांची खबर त्यांना माहिती होत्या. मात्र आता वृत्तपत्रांनी संजयचीही भूमिका करावी. भविष्यातील मानवी समाजावर येणा·या संकटांचा, परिस्थितीचा अंदाज घेऊन निराशा, भय, चिंतेच्या गर्तेतून समाजास बाहेर काढण्याकरीता वृत्तांकनातून व्हावे असेही त्यांनी स्पष्ट केले.

जयचंद नगर येथील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीडिया प्रभागाचे जिल्हा समन्वयक महादु हिरणवाळे यांनी करुन देतांना सांगितले की दरवर्षी या मीडिया व्याख्यानमालेचे आयोजन केले जाणार असून माध्यम क्षेत्रांतील अभ्यासकांचे विचार मंथन होणार आहे. उपस्थितांचे स्वागत बी.के. विजयादीदी यांनी तर अध्यक्षीय संबोधन बी.के. विद्यादीदी, शहादा यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन बी.के. योगीता बहन यांनी केले. कार्यक्रमास  बी.के. कल्पनादीदी समवेत अनेकांचे सहकार्य लाभले.  कोवीडच्या पाश्र्वभूमीवर सदरहू  व्याख्यानाचे प्रसारण कार्यक्रमाचे लाइव प्रसारण http://tiny.cc/NandurbarMedia युट्यूब लिंकवर करण्यात आले. त्याचा लाभ अनेक माध्यम प्रतिनिधींनी घेतला.