प्रतीक्षा संपली! अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा..
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२४ । महायुती सरकारची सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिन्याचे ७५०० हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. मात्र अद्यापही डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला नाहीय. त्यामुळे डिसेंबरचे १५०० रुपये कधी मिळणार? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे. आता या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली. ते म्हणाले आहे की, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या खात्यात पाठवले जातील. “आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत. ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत, त्या एकही बंद होऊ देणार नाही. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवले आहे, त्यांना हा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत.”असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे निकष बदलले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, काही लोक चुकीच्या पद्धतीने योजनेचा फायदा घेत असल्याचे लक्षात आले आहे. फडणवीस म्हणाले, “समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात, पण काही वाईट प्रवृत्ती देखील असतात. एखादी योजना चुकीच्या पद्धतीने वापरली जात असेल तर, जनतेचा पैसा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे. काही लोक चार-चार खाती उघडून योजनेचा फायदा घेत आहेत, हे आम्हाला माहित आहे.”
2100 रुपयांची घोषणा
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी माहिती दिली होती की अर्थसंकल्पानंतर महिलांना 2100 रुपये मिळू शकतील. मात्र, डिसेंबरच्या हप्त्यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील.
अन्य योजनांची पूर्तता
देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, ज्येष्ठांच्या आणि वंचित वर्गाच्या संदर्भात दिलेली आश्वासने पूर्ण करणार असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत. जनतेचा पैसा योग्य प्रकारे वापरला गेला पाहिजे.”