जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात आज सोमवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रविवारी देखील जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, जिल्ह्यात सध्या मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून, पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर २९ जून, ३० जून आणि २ जुलै रोजी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यलो अलर्टच्या कालावधीत जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच १, ३, ४ आणि ५ जुलै रोजीही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज
29 जून : विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस, 30 ते 40 किमी वेगाने वारे.
30 जून : विजांसह पावसाची शक्यता, वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास.
1 जुलै : ढगाळ वातावरण, काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस.
2 जुलै : विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज.
3 जुलै : ढगाळ वातावरण, तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी.
हवामान विभागाने नागरिक, शेतकरी आणि तापी नदीकाठच्या गावांतील रहिवाशांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.











