जळगाव लाईव्ह न्यूज | ३ जुलै २०२६ । जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवसांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज (शुक्रवारी) जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी विविध स्तरांचे पावसाचे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. विशेषतः मुंबई, कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पुढील ७२ तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये अवघ्या २४ तासांत २०० मिलिमीटरपर्यंत पावसाची नोंद होऊ शकते. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज रायगड आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसरासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अहिल्यानगर, जालना, बीड, परभणी, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
जळगावात सकाळपासून पावसाची रिपरिप
दरम्यान, हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी आज यलो अलर्ट जारी केला आहे. यापूर्वीही सलग दोन दिवस अलर्ट देण्यात आला होता. मात्र, अपेक्षेप्रमाणे मुसळधार पाऊस झाला नसून जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज सकाळपासून जळगाव शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत अधूनमधून रिमझिम पाऊस होत असून वातावरण ढगाळ झाले आहे. पावसाळी वातावरणामुळे दिवसभर कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून ते ३२ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर रात्रीचे किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान स्थिरावण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.












