⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | Jalgaon Roads : मत कर ये पथ, अग्निपथ.. अग्निपथ..

Jalgaon Roads : मत कर ये पथ, अग्निपथ.. अग्निपथ..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगावकरांचे दुर्दैव म्हणावे कि नशीब खराब हेच कळत नाही. जळगाव शहराचे सिंगापूर करायला निघालेल्या राजकारण्यांनी दिलेला शब्द तर पाळला नाहीच उलटपक्षी अमृत योजना आणि भूमिगत गटारीच्या कामामुळे रस्त्यांची पार वाट लागली. जळगावकर नागरिकांनी चांगल्या रस्त्यांसाठी तब्बल तीन वर्ष प्रतीक्षा केल्यावर रस्ते तयार होण्यास सुरुवात झाली. प्रमुख रस्त्यांचे गुणवत्तापूर्ण काम करण्यास मक्तेदाराने सुरुवात केली. कामाची पाहणी महापौरांनी केली, गुणवत्ता तपासणी थर्ड पार्टी ऑडिट देखील केले. सर्वांनी ओके दिला, रस्ता झाला आणि माशी शिंकली. जळगाव शहर मनपा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा दिसून आला. पाईपलाईन फुटली, पाईपलाईन टाकायची राहून गेली म्हणून रस्ते पुन्हा खोदावे लागले. एखाद्या रस्त्याचे ठीक होते पण प्रत्येक ठिकाणी तोच अडथळा निर्माण होऊ लागल्याने जोपर्यंत सर्व ठीक होणार नाही तोवर ते मार्गच तयार करू नये, अशी काहीशी भूमिका मक्तेदाराला घ्यावी लागत आहे. जळगावतील रस्ते असे अग्निपथप्रमाणे तयार झाले असून त्या मार्गावर पुढे काय वाढून ठेवलाय याचा अंदाज बंधने अवघड आहे. सर्व त्रुटींची पूर्तता झाली नाही तर उद्या मक्तेदारावरच सर्व फोडले जाईल हे मात्र निश्चित.

जळगावकर नागरिक प्रचंड सोशीक आहेत यात तिळमात्र शंका नाही. चीड येते ना या खड्ड्यांची अशी जोरदार कॅम्पेनिंग करीत भाजपने जळगाव मनपावर सत्ता प्रस्थापित केली. वर्षभरात जळगाव शहराचा कायापालट करणार या भूलथापांना जळगावकर भुलले आणि मनपाच्या किल्ल्या भाजपच्या हातात दिल्या. सुरुवातीला जळगावचा खरंच कायापालट होणार असे वाटत होते आणि ते खरे देखील झाले. जळगावकर जे रस्ते कसेबसे वापरत होते ते आणखी खराब झाले. विकास करण्यासाठी रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले. भूमिगत गटार, अमृत योजनेचे काम रखडले. कोरोना काळ आला आणि खरोखर जळगावचा कायापालट झाला. रस्त्यात खड्डे कि खड्ड्यांचा रस्ता हेच कळेना झाले. भाजपची लाईन मनपात बसण्यापूर्वीच त्यांचा संसार उध्वस्त झाला. शिवसेनेने भाजपच्या वऱ्हाडींशी सलगी करीत आपले बस्थान बसविले. जळगावकरांच्या आशा पुन्हा उमलल्या.

करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर शिवसेना नियोजनाला लागली. राज्यातील सत्तेचा फायदा घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील आणि शिवसेनेच्या जेष्ठ सदस्यांनी योग्य तो निधी आपल्या पारड्यात पाडून घेतला. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कामांची स्थगिती उठवली, निधीला मुदतवाढ मिळवली. सर्व पूर्तता पूर्ण करीत जळगाव शहरात विकासकामांना प्रामुख्याने मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी तर आपले काम केले पण त्याला पुढे मार्गी लावण्याचे खरे काम असते ते मनपा प्रशासनाचे. मनपा प्रशासकीय अधिकारी काम करीत नसतील तर त्यांच्याकडून काम करून घेणे किंवा काढण्याची जबाबदारी देखील सत्ताधाऱ्यांचीच असते. जळगावात मात्र सध्या तसे कोणतेच चित्र पाहावयास मिळत नाही. मनपाचे प्रमुख आयुक्तच काही दिवसांचे पाहुणे असल्याने ते आपल्या कार्यकाळ शांततेत पूर्ण करण्याच्या मागे आहे. नेमका तोच फायदा घेत इतर अधिकारी मात्र निवांत झाले आहे.

जळगावात मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्या ठिकाणी पाईपलाईन, भूमिगत गटारी यांचे काम पूर्ण झाले आहे का? याची पडताळणी होणे आवश्यक आहे. जळगाव शहरात मात्र काहीसे वेगळे चित्र आहे. तोंडी बोलताना काम झाले असा सल्ला द्यायचा आणि काम झाल्यावर मात्र हे राहिले, ते राहिले म्हणत तयार रस्त्यावर खोदकाम करायचे असा कार्यक्रम सुरु आहे. रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी महापौर जयश्री महाजन स्वतः पाहणी करीत आहेत तर कामाचे थर्ड पार्टी ऑडिट देखील केले जात आहे. काम चोख होत असल्याची ग्वाही मक्तेदार, महापौर, अधिकारी देत असले तरी ते कितपत तग धरणार हा मोठा प्रश्नच आहे. शहरात नव्याने तयार केल्या जाणाऱ्या रस्त्यांवर पाईपलाईन फुटणे, पाईपलाईन टाकण्याची राहून जाणे, लिकेज दुरुस्त करणे अशी कामे निघत असून त्यामुळे एकतर रस्त्याचे काम थांबवावे लागत आहे. दुसरे म्हणजे रस्ताच खोदावा लागतोय, तिसरे म्हणजे मनपाचा आणि नागरिकांच्या पैशांचा चुराडा होतोय. काही महाभाग हॉकर्सने तर चक्क रस्त्यावर आपले दुकान थाटात छत्री अडकविण्यासाठी आसारीचे तुकडे खोचत खड्डे केले आहेत.

मक्तेदाराने याबाबत मनपा प्रशासनाला पत्र लिहून तसे कळविले देखील असून काम न करण्याची भूमिका घेतली आहे. मनपा प्रशासन जोवर लेखी देणार नाही तोवर काम होणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. मक्तेदाराची चूक देखील नाही, तो करतोय ते बरोबरच आहे. मनपा प्रशासनाने आपले काम चोखपणे केले, अमृतच्या मक्तेदाराकडून करून घेतले तर जळगावचे मंजूर रस्ते लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होणार आहे. रस्ते तयार करण्यास आता केवळ दीड महिनाच अवधी शिल्लक असून त्यात जर रस्ते झाले नाही तर पुढे पावसाळ्यात दुप्पट त्रास सहन करण्यासाठी सहनशक्ती जळगावकरांना देवाकडेच मागावी लागणार आहे. जळगावचे असे झाले आहे नाचता येईना, अंगण वाकडे. जळगाव शहरात रस्ते तयार करायच्या कामाला सुरुवात झाली असली तरी मनपा प्रशासन मात्र स्वतःच्या चुकांवर पांखरूंन घालत मक्तेदारालाच उद्या दोष देणार हे नक्की. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक देखील इतके पॉवरफुल नाही कि ते अधिकाऱ्यांकडून काम काढून घेतील. तूर्तास तरी ‘मत कर ये पथ, अग्निपथ.. अग्निपथ..’ अशीच भूमिका मक्तेदार घेतांना दिसून येत आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.