बंडखोर नगरसेवकांनी बाजू मांडण्यासाठी पुन्हा मागितली मुदत

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२१ । जळगाव महापालिकेत महापौर निवडीच्‍यावेळी भाजपाचा व्हीप झुगारत शिवसेनेच्या उमेदवारास मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अपात्रतेची नोटीस बजावली होती. आपली बाजू मांडण्यासाठी बंडखोर नगरसेवकांना २३ जुलै पर्यंतची मुदत दिली होती. परंतु नगरसेवकांनी बाजू मांडण्यासाठी आणखी मुदत मागितली.

याबाबत असे की, जळगाव महापालिकेत महापौर निवडीच्‍यावेळी सत्‍तांतर झाले. एकहाती सत्‍ता मिळविलेल्‍या भाजपच्‍या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला पाठींबा दिल्‍याने महापालिकेवर भगवा फडकला होता.  त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, भाजपने २७ नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील केले. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे.  त्यात बाजू मांडण्यासाठी नगरसेवकांनी मुदत मागितली. शुक्रवारी या अपिलात अवघे ५ मिनिट कामकाज झाले. बंडखोरांच्या वतीने वकिलामार्फत बाजू मांडण्यासाठी पुन्हा मुदत मागितली. त्यात विभागीय आयुक्तांनी आता १० ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित केली आहे.