⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

Maharashtra Crisis : राज्यातील घडामोडींवर इंदोरीकर महाराजांची जोरदार बॅटिंग..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२२ । शिंदे गटाच्या बंडखोरीने राज्यातील राजकारण हादरून गेलं आहे. या बंडखोरीने कोणत्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार कोसळू शकते. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे जवळपास ४० आमदार गळाला लावले आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना देखील मोठा झटका बसला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीवर लोकप्रिय किर्तनकार इंदोरीकर महाराज (indurikar maharaj kirtan) यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाष्य केले आहे.

जगात काही राहिलं नाही. तीन दिवस झाले कोणाला काही समजेनासे झाले आहे. टीव्हीचं बटण दाबलं की, नुसत्या राजकारणाच्या बातम्या पाहायला मिळतात. तुम्ही सगळे असेच मरणार, असे इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनादरम्यान म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

चाळीसगावमध्ये भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी राजकारण्यांवर खोचक शैलीत निशाणा साधला. ज्यांच्याकडे तालुके आहेत, त्यांना शिकवावं लागतं, मतदान कसं करायचं. त्यांची तीनवेळा बैठक घ्यावी लागते. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची आंधळे दळत आणि कुत्रं पीठ खातं’ असा टोला कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी आमदारांना लगावला.

आज जे चाललंय ते पंचांगने सांगितले होते. कालचं आणि आजचं जे सांगितलं होतं ते पंचागामध्ये सांगितलं होतं. कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही, जनतेचा भरडा झाला आहे. दोन दिवस झाली तुकोबांच्या पालखीची बातमी दिसत नाही. माऊलींची पालखी पुण्यातून निघाली बातमी दिसत नाही. पाऊस पडला आहे, शेतकऱ्यांना बियाणं भेटत नाही, तो हवालदिल झाला आहे. पण, कुणालाच काही फरक पडत नाही.कुणीही दखल घेत नाही, अशी टीकाही यावेळी इंदुरीकर महाराजांनी केली.