भडगावच्या तरुणाचा गिरणा नदीत मृतदेह आढळल्याने खळबळ

जून 19, 2026 8:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव तालुक्यातील वाडे येथील २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे परिसरातील गिरणा नदीपात्रात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शामकांत अशोक माळी (वय २८, रा. वाडे, ता. भडगाव) असे मृत तरुणाचे नाव असून बहाळ येथे अवैध ताडीचे सेवन केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

shamkant mali

मिळालेल्या माहितीनुसार, शामकांत मंगळवारी सायंकाळी बहाळ येथील बसस्थानक परिसरात आला होता. यावेळी त्याने ताडीचे सेवन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, बुधवारी चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे येथील गिरणा नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची ओळख शामकांत माळी अशी पटली.

मृतदेह मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांनी शवविच्छेदन केले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी शामकांत यांचा ‘व्हिसेरा’ नमुना नाशिक येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मेहुणबारे पोलीस ठाण्याचे एपीआय नितीन पाटील यांनी दिली.

अवैध ताडी विक्रीविरोधात ग्रामस्थांचा संताप

बहाळ बसस्थानक परिसरात अनेक वर्षांपासून विनापरवाना अवैध ताडी व दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळेच एका तरुणाचा बळी गेल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now