जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगावातून खुनाची धक्कादायक घटना समोर आलीय. दुकान लावण्याच्या किरकोळ वादातून २९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना शहरातील तसऱ्यापूरक (तारसोड नाका) परिसरात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभय मधुकर पाटील (वय २९, रा. तांबोळीनगर, चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास अभय घराबाहेर गेला होता. त्यानंतर तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी अभय याचा मृतदेह शहरातील माळेगाव रोड परिसरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

प्राथमिक तपासात दुकान लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. अभय याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दुकान लावण्याच्या वादातून घडलेल्या या हत्येमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करीत आहेत.











