तेल संकटादरम्यान भारत सरकारने घेतला अत्यंत मोठा निर्णय ; थेट सवलत..

एप्रिल 2, 2026 3:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२६ । मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती आणि इराण व अमेरिका यांच्यातील संघर्षामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होत असताना, भारत सरकारने उद्योग आणि शेती क्षेत्राला दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने प्रमुख पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय जाहीर केला असून ही सवलत २ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे.

Indian government big decision

या निर्णयामुळे खत आणि औषधनिर्माण क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे. विशेषतः अमोनियम नायट्रेटसह अनेक महत्त्वाच्या रसायनांवरील आयात शुल्क हटवण्यात आले आहे. याचा थेट फायदा खत कंपन्यांना होणार असून शेतकऱ्यांसाठी खतांची उपलब्धता आणि किंमत नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जेपी नड्डा यांनी युरिया आणि डीएपी खतांच्या उपलब्धतेबाबत राज्यांच्या कृषी मंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. तसेच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही यासंदर्भात संसदेत भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

अर्थ मंत्रालयाने अमोनियम नायट्रेट, मिथेनॉल, फिनॉल, पीव्हीसी आणि पॉलीप्रोपिलीन यांसारख्या सुमारे ४० प्रकारच्या पेट्रोकेमिकल कच्च्या मालावरील आणि मध्यवर्ती उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द केले आहे. जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांना चालना देणे आणि ग्राहकांना दिलासा मिळवून देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने देशात तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे.मध्य-पूर्वेतील महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या होर्मुज खाडी परिसरात काही भारतीय जहाजे अडकल्याची माहिती समोर आली आहे. ही जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू असून संबंधित यंत्रणांमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू आहेत.

काही जहाजांना मार्ग मोकळा करून सोडण्यात आले असले तरी अजूनही काही जहाजे त्या भागात अडकून असल्याने परिस्थिती तणावपूर्ण आहे. युद्ध अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत असल्याने पुढील काळात ऊर्जा पुरवठा, व्यापार आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now