जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी उज्ज्वला योजना लाभार्थ्यांना मोठा धक्का दिला आहे. सरकारने सवलतीच्या एलपीजी (LPG) सिलेंडरच्या नियमात मोठा बदल केला असून, आता वर्षाला मिळणाऱ्या सबसिडीच्या सिलेंडर संख्येत कपात केली आहे. नव्या नियमानुसार आता वर्षभरात केवळ ४ गॅस सिलेंडरवरच सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी लाभार्थ्यांना ९ सिलेंडरवर सबसिडी मिळत होती. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

२०१६ मध्ये जेव्हा उज्ज्वला योजना सुरू झाली, तेव्हा लाभार्थ्यांना वर्षाला १२ सिलेंडरवर सबसिडी मिळत होती. नंतर ही संख्या ९ करण्यात आली आणि आता ती थेट ४ वर आणली गेली आहे. सरकारच्या या निर्णयामागे आंतरराष्ट्रीय परिस्थिती नसून लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष गॅस वापराचा अभ्यास कारणीभूत असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीणमल खनुजा यांनी सांगितले की, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांचा वार्षिक सरासरी वापर लक्षात घेऊनच सबसिडीची मर्यादा कमी करण्यात आली आहे.

एकीकडे सबसिडीचे सिलेंडर कमी झाले असतानाच, दुसरीकडे एलपीजी सिलेंडरच्या किमतीतही वाढ झाली आहे. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचा भाव आता ९४२ रुपये झाला आहे. दरम्यान, सरकारने मे २०२२ मध्ये प्रति सिलेंडर २०० रुपयांची सबसिडी सुरू केली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये ती वाढवून ३०० रुपये करण्यात आली. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ही सबसिडी वजा जाता आता लाभार्थ्यांना एका सिलेंडरसाठी ६४२ रुपये मोजावे लागणार आहेत. महागड्या दरांमुळे आता गरीब कुटुंबांमध्ये गॅसचा वापर आणखी कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.












