जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२६ । अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या ऐतिहासिक शांतता कराराचे आंतरराष्ट्रीय पडसाद आता जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि सराफ बाजारावर मोठ्या प्रमाणावर उमटू लागले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कराराची घोषणा करताच, गेल्या अनेक महिन्यांपासून विक्रमी पातळीवर असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. मात्र, दुसरीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणाऱ्यांची संख्या वाढल्याने सोन्या-चांदीच्या किमतींत मोठा फेरबदल झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी सकाळी बाजार उघडताच जळगाव सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड मोठी दरवाढ पाहायला मिळाली.

जळगाव सराफ बाजारात सोन्याचा भडका
‘गुडरिटर्न्स’ (Goodreturns) च्या माहितीनुसार, जळगाव सराफ बाजारात सोमवारी सकाळी व्यवहार सुरू होताच सोन्याच्या सर्वच प्रकारांमध्ये मोठी वाढ नोंदवली गेली. २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर तब्बल २,४५० रुपयांनी वधारून आता १,५१,५३० रुपये प्रति १० ग्रॅम या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे.

असे आहेत सोन्याचे ताजे दर:
२४ कॅरेट सोने: २४५० रुपयांची वाढ होऊन १,५१,५३० रुपये प्रति १० ग्रॅम.
२२ कॅरेट सोने: २२५० रुपयांची वाढ होऊन १,३८,९०० रुपये प्रति तोळा (१० ग्रॅम).
१८ कॅरेट सोने: १८४० रुपयांची वाढ होऊन १,१३,६५० रुपये प्रति १० ग्रॅम.
चांदीत तब्बल ५,००० रुपयांचीझेप!
सोन्यापाठोपाठ आज चांदीच्या दरानेही ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. चांदीच्या दरात ५,००० रुपये प्रति किलोची घसघशीत वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर जळगावात आता एक किलो चांदीचा दर थेट २,६५,००० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
भू-राजकीय तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याच्या आशेने तेलाचे आंतरराष्ट्रीय भाव कोसळले आहेत. मात्र, जागतिक बाजारपेठेतील अनपेक्षित बदलांमुळे आणि चलन बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा पुन्हा सोन्याकडे वळवला आहे. परिणामी, सोन्याला पुन्हा एकदा मोठी झळाळी मिळाली असून बाजारपेठेत तेजीचे वातावरण आहे.











