जळगाव लाईव्ह न्यूज । जर तुम्ही चित्रपट, वेब सीरिज आणि थेट सामन्यांचे शौकीन असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. वेगवेगळ्या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सच्या महागड्या सबस्क्रिप्शनमुळे खिशाला बसणारी झळ आता थांबणार आहे. भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी ‘एअरटेल’ने (Airtel) आपल्या युजर्सना मोठा दिलासा देत आपली ‘एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम’ (Xstream Play Premium) सेवा अत्यंत परवडणाऱ्या किमतीत पुन्हा लाँच केली आहे. आता वापरकर्त्यांना तब्बल २० हून अधिक प्रीमियम ओटीटी ॲप्सचा कंटेंट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

फक्त ९९ रुपयांमध्ये मनोरंजनाचा धमाका
एअरटेलने आपला ‘एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम’ मासिक पॅक अवघ्या ९९ रुपयांमध्ये बाजारात आणून ओटीटी क्षेत्रात मोठी खळबळ माजवून दिली आहे. हा प्लॅन विशेषतः अशा ग्राहकांसाठी डिझाइन केला आहे, ज्यांना कमी बजेटमध्ये दर्जेदार मनोरंजन हवे आहे. या प्लॅनच्या किमतीने आणि मिळणाऱ्या फायद्यांनी इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

सोनी लिव्हसह २० हून अधिक प्रीमियम ॲप्सचा खजिना
या प्लॅनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एकाच वेळी २० हून अधिक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मिळते.ग्राहकांसाठी यामध्ये ‘Sony LIV’ चा समावेश करण्यात आला आहे, ज्यासाठी सहसा लोक वेगळे आणि महागडे सबस्क्रिप्शन घेतात. फॅनकोड (FanCode), लायन्सगेट प्ले (Lionsgate Play), इरोज नाऊ (Eros Now), शेमारूमी (ShemarooMe) आणि हंगामा प्ले (Hungama Play) यांसारख्या अनेक आघाडीच्या प्लॅटफॉर्मचा यात समावेश आहे.
फोनची मेमरी फुल होण्याची कटकट मिटली!
वेगवेगळे शो पाहण्यासाठी वापरकर्त्यांना अनेकदा दहा वेगवेगळे ॲप्स डाउनलोड करावे लागतात, ज्यामुळे फोनची मेमरी भरू शकते. एअरटेलने यावर एक उत्तम उपाय शोधला आहे. सर्व २० ॲप्समधील कंटेंट ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला वेगळे ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्ही हा सर्व कंटेंट थेट ‘एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले’ ॲपमध्ये शोधू शकता. तुम्हाला फक्त ॲपमध्ये लॉग इन करायचे आहे आणि तुमचे काम झाले.
मोबाईलच नाही, तर टीव्ही आणि लॅपटॉपवरही चालणार
हा ९९ रुपयांचा प्लॅन केवळ मोबाईल स्क्रीनपुरता मर्यादित नाही. या सिंगल सबस्क्रिप्शनच्या मदतीने युजर्स आपले आवडते चित्रपट, सीरिज आणि लाइव्ह स्पोर्ट्स मॅचेस स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, टॅब्लेट किंवा कॉम्प्युटरवर देखील पाहू शकतात. जर तुमच्याकडे एअरटेल एक्सस्ट्रीम सेट-टॉप बॉक्स किंवा अँड्रॉइड टीव्ही असेल, तर मोठ्या स्क्रीनवर मनोरंजनाचा आनंद आणखी द्विगुणित होईल.










