जळगाव लाईव्ह न्यूज । ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठी कात्री लागली आहे. घरगुती एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या किमतीत २९ रुपयांची वाढ करण्यात आली असून, नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. या नव्या दरवाढीमुळे गृहिणींचे स्वयंपाकघराचे बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे.

जळगावात आता मोजावे लागणार ₹९४७.५०
या ताज्या दरवाढीनंतर जळगाव जिल्ह्यात १४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आता ₹९१८.५० वरून थेट ₹९४७.५० वर पोहोचली आहे. स्थानिक वाहतूक खर्च आणि कर रचनेमुळे देशाची राजधानी दिल्लीच्या (₹९४२) तुलनेत जळगावकरांना सिलिंडरसाठी साधारण ५ रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

३ महिन्यांत तब्बल ८९ रुपयांची वाढ
विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत घरगुती गॅसच्या किमती वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात सिलिंडरच्या दरात ₹६० ची मोठी वाढ करण्यात आली होती. यांनतर आज २९ रुपयांनी वाढ झाली असून या दोन्ही दरवाढी मिळून अवघ्या ३ महिन्यांच्या आत जळगावात घरगुती सिलिंडर तब्बल ८९ रुपयांनी महागला आहे. (फेब्रुवारी महिन्यात जळगावात हाच दर ₹८५८.५० इतका होता).
दरवाढीचे कारण काय?
वृत्तसंस्थेने तेल कंपन्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऊर्जेच्या (इंधनाच्या) किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच देशांतर्गत बाजारपेठेत होणाऱ्या विक्रीमुळे तेल कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. हा तोटा भरून काढण्यासाठी ही किंमत वाढवणे भाग पडले आहे.








