जळगाव लाईव्ह न्यूज । शाळा आणि महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जळगाव जिल्हा पोलिस दलाने एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. प्रवासादरम्यान आणि बसस्थानकांवर विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, टवाळखोरी आणि इतर सामाजिक समस्यांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात ‘विशेष सुरक्षा व जनजागृती उपक्रम’ सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आता एस.टी. आगार, बसस्थानके आणि मुख्य रिक्षा थांब्यांवर पोलिसांचा कडक पहारा असणार आहे.

मोहिमेची गरज का भासली?
ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी दररोज बस, रिक्षा किंवा टमटमने प्रवास करतात. मात्र, बस थांब्यांवर किंवा प्रवासादरम्यान टवाळखोरांकडून मुलींचा पाठलाग करणे, अश्लील टिप्पण्या करणे आणि छेडछाड करण्याचे प्रकार समोर आले आहेत. याशिवाय, अल्पवयीन मुली पळून जाणे, तरुण मुले चुकीच्या संगतीला लागून व्यसनांकडे व गुन्हेगारीकडे वळणे अशा सामाजिक समस्या वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.

उपक्रमाची उद्दिष्टे
विद्यार्थिनींना सुरक्षित व निर्भय वातावरण उपलब्ध करून देणे.
शाळा व महाविद्यालय परिसर तसेच बसस्थानकांवरील छेडछाड रोखणे.
अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या घटनांवर प्रतिबंध आणणे.
युवकांना वाईट संगती, व्यसन व गुन्हेगारी प्रवृत्तींपासून दूर ठेवणे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि पोलिस यांच्यात विश्वासाचे नाते निर्माण करणे.
महिला सुरक्षा व बालसुरक्षा विषयक जनजागृती करणे.
उपक्रमाची अंमलबजावणी
आधीच नियुक्त केलेले पोलिस काका व पोलिस दीदीं हे
प्रत्येक महत्त्वाच्या ग्रामीण बसस्थानकावर शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील.
विद्यार्थिनींसाठी महिला पोलिस कर्मचारी (पोलिस दीदी) उपलब्ध राहतील.
विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला जाईल.
बसस्थानकांवर विशेष गस्त
शाळा व कॉलेज सुटण्याच्या वेळेत नियमित गस्त घालण्यात येईल.
संशयास्पद व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवले जाईल.
टवाळखोर, रोडरोमिओ आणि छेडछाड करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल.
आवश्यकतेनुसार ओळखपत्र तपासणी व चौकशी केली जाईल.
विद्यार्थिनी सुरक्षा देखरेख
विद्यार्थिनींना त्रास होत असल्यास त्वरित मदत उपलब्ध करून दिली जाईल.
महिला पोलिसांकडून समुपदेशन व मार्गदर्शन केले जाईल.
तक्रारी गोपनीयपणे स्वीकारल्या जातील.
अल्पवयीन मुलांवर विशेष लक्ष
शाळा बुडवून फिरणारे विद्यार्थी आढळल्यास त्यांची माहिती शाळा व पालकांना दिली जाईल.
संशयास्पद हालचाली आढळल्यास आवश्यक समुपदेशन केले जाईल.
अल्पवयीन मुली पळून जाण्याची शक्यता असलेल्या घटनांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील.
जनजागृती कार्यक्रम
शाळा व महाविद्यालयांमध्ये सुरक्षा विषयक मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जातील.
महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध, बालहक्क याबाबत माहिती दिली जाईल.
हेल्पलाईन क्रमांकांची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाईल.
समन्वय यंत्रणा
पोलिस, एसटी महामंडळ, शाळा-महाविद्यालय प्रशासन आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय ठेवला जाईल.
संवेदनशील ठिकाणांची ओळख करून विशेष देखरेख केली जाईल.
आवश्यकतेनुसार सीसीटीव्ही निरीक्षण आणि अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवला जाईल.
पोलिसांची कार्यपद्धती
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमित व अचानक भेटी.
संशयित व्यक्तींची माहिती संकलित करून पडताळणी.
छेडछाड व महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांवर शून्य सहनशीलता धोरण.
विद्यार्थी व पालकांच्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद.
बालकांशी संबंधित प्रकरणांमध्ये संवेदनशील आणि कायदेशीर कार्यवाही.
महिला पोलिसांच्या माध्यमातून मुलींना विश्वासपूर्वक संवादाची संधी.
शाळा व्यवस्थापनासोबत नियमित आढावा बैठक.
अपेक्षित परिणाम
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेत वाढ.
छेडछाड व टवाळखोरीच्या घटनांमध्ये घट.
अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या घटनांवर नियंत्रण.
युवकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण.
पालकांचा पोलिस प्रशासनावरील विश्वास दृढ होणे.
सुरक्षित, सकारात्मक आणि शैक्षणिक वातावरणाची निर्मिती.








