जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे भारतात कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्यातच अमेरिका आणि बांग्लादेश यांच्यात वस्त्रोद्योग क्षेत्रात झालेल्या नव्या व्यापार करारामुळे भारतीय कापूस उत्पादक आणि कापड उद्योगासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या करारानुसार, अमेरिकन कापसापासून बांग्लादेशात तयार होणाऱ्या कपड्यांवर अमेरिकेत शून्य टक्के आयात शुल्क आकारले जाणार आहे. मात्र भारतातून निर्यात होणाऱ्या तत्सम उत्पादनांवर १८ टक्के कर कायम ठेवण्यात आला आहे.

या निर्णयामुळे बांग्लादेश अमेरिकन कापसाला अधिक प्राधान्य देऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत बांग्लादेश हा भारतीय कापसाचा प्रमुख आयातदार देश राहिला आहे. विशेषतः महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही बाजारपेठ महत्त्वाची मानली जाते.

जर बांग्लादेशाने अमेरिकन कापसाकडे वळण्याचा निर्णय घेतला, तर भारतीय कापसाची मागणी घटू शकते. परिणामी देशांतर्गत बाजारात कापसाची आवक वाढून दर घसरण्याची शक्यता आहे. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. तसेच कापड उद्योगालाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अमेरिकेशी चर्चा करून भारतीय कापूस व वस्त्रोद्योगासाठी सवलती मिळवाव्यात, अशी मागणी उद्योगक्षेत्र आणि शेतकरी संघटनांकडून होत आहे. अन्यथा कापूस उत्पादकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, अमेरिका–बांग्लादेश करारामुळे भारतीय कापूस बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून पुढील धोरणात्मक पावले महत्त्वाची ठरणार आहेत.












