जळगाव लाईव्ह न्यूज । तुमच्या नावावर किंवा ओळखपत्रावर घेतलेले सिम कार्ड दुसऱ्या व्यक्तीला देणे, विकणे किंवा भाड्याने देणे आता तुम्हाला अत्यंत महागात पडू शकते. बनावट ओळखपत्रांवर सिम कार्डची खरेदी-विक्री करणाऱ्यांना किंवा मोबाईलच्या IMEI क्रमांकामध्ये फेरफार करणाऱ्यांना ३ वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांपर्यंतचा मोठा दंड होऊ शकतो.

दूरसंचार विभागाने सोमवारी SIM कार्डच्या फसव्या वितरणासह दूरसंचार ओळख क्रमांकांचा गैरवापर आणि IMEI क्रमांकात फेरफार करण्याबाबत नागरिक तसेच दूरसंचार क्षेत्रातील संबंधितांना सतर्क केले. सायबर गुन्ह्यांमध्ये SIM कार्डचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी सरकारकडून कडक पावले उचलली जात आहेत.

छत्तीसगडमध्ये समोर आलेल्या एका सायबर फसवणूक प्रकरणानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. एका एजंटने नागरिकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नकळत तब्बल २५ बनावट SIM कार्ड सक्रिय केल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर संबंधित सर्व क्रमांक ब्लॉक करण्यात आले असून एजंटला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
तुमच्या नावावरील SIM गुन्ह्यात वापरला तर?
सरकारने नागरिकांना विशेष सावध केले आहे. तुमच्या ओळखपत्रावर नोंद असलेले SIM कार्ड दुसऱ्या व्यक्तीकडून सायबर फसवणूक किंवा अन्य गैरकायदेशीर कामासाठी वापरले गेले, तर संबंधित ग्राहकावरही कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या SIM कार्डला ‘म्युल SIM’ म्हटले जाते.
याशिवाय कॉलिंग आयडीमध्ये फेरफार करून किंवा विविध ॲपच्या माध्यमातून बनावट क्रमांकावरून कॉल करणेही गंभीर बाब मानली जात आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर दूरसंचार विभागाची विशेष नजर आहे.
एका व्यक्तीला किती SIM ठेवता येतात?
देशात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त ९ SIM कार्ड ठेवण्याची मर्यादा आहे. मात्र जम्मू-काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये ही मर्यादा ६ SIM कार्डांपर्यंत आहे. या मर्यादेपेक्षा जास्त SIM कार्ड कोणाच्या नावावर आहेत, हे शोधण्यासाठी सरकारने डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मवर फोटो दर्शविणारे नवीन पोर्टल जोडले आहे.सर्व दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या प्रणाली या पोर्टलशी जोडण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
नागरिकांनी आजच SIM कार्ड तपासावे
तुमच्या ओळखपत्रावर तुमच्या माहितीस नसलेला किंवा अनधिकृत मोबाईल क्रमांक सुरू आहे का, हे नागरिकांनी तपासणे महत्त्वाचे आहे. यासाठी सरकारने ‘संचार साथी’ पोर्टल आणि ॲपचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या नावावर किती मोबाईल क्रमांक सक्रिय आहेत, याची माहिती तपासून अनधिकृत क्रमांक आढळल्यास त्याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











