जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात एकीकडे घरफोडीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून अशातच चोरट्यांनी गोलाणी मार्केटमध्ये धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. मार्केटमधील एका मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले, तर अन्य दोन दुकानांचे लॉक तोडून चोरीचा प्रयत्न केला असताना सेंट्रल लॉकमुळे मोठी चोरी टळली. दरम्यान, या घटनेमुळे व्यापारी वर्गात तीव्र चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

गोलाणी मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील विशाल मोबाईल या दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानमालक विशाल मधुकर शिंपी यांनी रात्री दुकान बंद केले होते. सकाळी शेजारील दुकानदाराचा फोन आल्यानंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे समजले. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडले. त्यानंतर दुरुस्तीसाठी ग्राहकांकडून आलेले अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरून नेले. दुकानातील ड्रॉवरही फोडण्यात आला.

तळमजल्यावरील दुकान क्रमांक ८ मधील सनशाईन मोबाईल दुकानातही चोरट्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. दुकानमालक सौरभ खियलदास केसवानी यांनी रात्री दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता बाजूचे लॉक आणि कडी तोडलेली दिसली.मात्र, दुकानाला असलेल्या सेंट्रल लॉकमुळे चोरट्यांना आत प्रवेश करता आला नाही. या दुकानात तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती आहे. सेंट्रल लॉक नसते तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते.
रुद्र फूटवेअरचेही लॉक तोडले
गोलाणी मार्केटमधील रुद्र फूटवेअर दुकानालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानाचे साईड लॉक तोडण्यात आले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार दुकानातील माल चोरीला गेलेला नाही. या दुकानात सुमारे दोन लाख रुपयांचा माल असल्याचे सांगण्यात आले.
एकाच रात्री तीन दुकानांना लक्ष्य केल्याने या घटनांमागे एकाच टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चार संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान,गोलाणी मार्केट हे शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र आहे. अशा ठिकाणी मध्यरात्री चोरट्यांनी सलग तीन दुकानांना लक्ष्य केल्याने रात्रीच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे










