जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यातील महत्वकांक्षी असलेल्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा गतवर्षीपेक्षा कमी पाऊस आहे. याचा परिणामी धरणातून होणाऱ्या विसर्गावर झाला आहे. आज सकाळी हतनूर धरणाचे ४ दरवाजे उघडले आहे. यातील दोन दरवाजे १ मीटरने तर २ दरवाजे २ मीटरने उघडण्यात आले. त्याद्वारे ५९२६ क्यूसेस पाण्याचा विसर्ग तापी नदीत केला आजच्या आहे. दरम्यान यंदा विसर्ग कमी असला तरी धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के जलसाठा केला जाणार आहे.

यामुळे रेल्वे, दीपनगर वीज केंद्र, जळगाव व मलकापूर एमआयडीसी, आयुध निर्माणी आदी प्रकल्पांसह ११० गावांना पाणीपुरवठा होण्यात अडचण येणार नाही. यंदा जून, जुलै व सध्या ५ ऑगस्टपर्यंत हतनूर धरणातून एक वेळाही संपूर्ण ४१ दरवाजे उघडून विसर्ग झाला नाही.

गेल्या वर्षी देखील अधिक पाऊस असताना सुद्धा संपूर्ण ४१ दरवाजे उघडून विसर्ग झाला नव्हता. या उलट सन २०२३ मध्ये कमी पाऊस असताना देखील जुलै महिन्यात तसेच १६ सप्टेंबर रोजी संपूर्ण ४१ दरवाजे उघडून विसर्ग झाला होता. यंदा अशी वेळ आली नाही. मात्र, विसर्ग करुनही धरणात सरासरी ५५ ते ५८ टक्के साठा आहे. द्वार परिचलन करुन १५ ऑक्टोबरपर्यंत १०० टक्के साठा केला जाईल, अशी माहिती शाखा अभियंता एस. जी. चौधरी यांनी दिली.












