जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील पाटील मळा परिसरात ३५ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री समोर आली आहे. तुषार गोविंद सोनवणे (वय ३५, रा. भुसावळ, जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने एका १७ वर्षीय अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे हे भुसावळ रेल्वे कॅन्टीनमध्ये काम करत होते. रात्री तुषार हा परिचिताची दुचाकी (एम.एच.19 सी.एच.1405) घेवून पाटीलमळा भागातून जात असताना अल्पवयीन संशयीताशी त्याचा कुठल्यातरी कारणातून वाद झाला व संशयीताने पाठीमागून डोक्याखाली व पाठीवरील भागात चाकूचे सपासप वार केल्याने अतिरक्तस्त्रावाने जागीच तरुणाचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही तपासाला वेग दिला. पोलिसांनी संशयित अल्पवयीन मुलाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले.या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.











