⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

बिग ब्रेकिंग : महाराष्ट्र सरकार १८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण काही दिवस थांबवणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२२१। महाराष्ट्रासह देशात सध्या कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा आहे. 45 वर्षांवरील वयोगटातील पाच लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले डोस 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

तूर्तास 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण काही दिवस स्लो डाऊन करावं लागेल, असं राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यात आतापर्यंत 1 कोटी 84 लाख नागरिकांचं लसीकरण झालं आहे. केंद्राकडून 45 वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांसाठी लसी येत आहेत. पाच लाख नागरिक कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. तर कोविशील्ड लसीच्या प्रतीक्षेत 16 लाख जण आहेत.

या क्षणाला कोवॅक्सिन लसीचे केवळ 35 हजार डोसच उपलब्ध आहेत. 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले कोवॅक्सिन लसीचे पावणे तीन लाख डोस उपलब्ध आहेत तर केंद्राने दिलेले 35 हजार डोस आहेत. हे सर्व डोस 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरले जाणार आहेत.