जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२६ । ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला मे महिन्याच्या ₹१५०० च्या हप्त्याच्या वितरणासाठी तब्बल ३४४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात हा हप्ता कधी जमा होणार, याची थेट तारीखच जाहीर केली आहे.

पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या १२ ते १५ जून दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती भाजप आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे.

मोनिका राजळे यांच्या या घोषणेमुळे लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अनेक महिलांनी यापूर्वी हप्ता जमा होण्यास झालेल्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र आता निधी मंजूर झाल्याने आणि संभाव्य तारखा समोर आल्याने लाभार्थींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान अपात्र महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नसून त्यांच्या खात्यात मे महिन्याचा कोणताही हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.












