भुसावळरेल्वे

खुशखबर! कोविडमध्ये बंद पडलेली भुसावळची ‘ही’ रेल्वे पुन्हा धावणार; रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कोविड-१९च्या काळात बंद करण्यात आलेली भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस आता पुन्हा रुळावर धावणार आहे. भुसावळ ते नागपूरदरम्यान नवीन रेल्वेगाडी सुरू करण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, यामुळे भुसावळसह बऱ्हाणपूर, नेपानगर, खंडवा आणि निमाड परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दादाजी धाम येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठीही ही रेल्वेगाडी महत्त्वाची ठरणार आहे.

गाडी क्रमांक १११११/११११२ भुसावळ-नागपूर एक्स्प्रेस बऱ्हाणपूर, नेपानगर, खंडवा आणि तलवडिया मार्गे धावणार आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना नागपूरकडे जाण्यासाठी आणखी एक रेल्वेगाडी उपलब्ध होणार आहे.

भुसावळ ते खंडवा, इटारसी आणि बैतूलदरम्यान नवीन रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २३ नोव्हेंबर भुसावळ-नागपूर एक्स्प्रेसला मंजुरी दिल्याची माहिती दिली.

कोविड काळात रेल्वे सेवा बंद झाल्यानंतर या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता ही रेल्वे पुन्हा सुरू होणार असल्याने भुसावळ, नेपानगर, बऱ्हाणपूर, खंडवा तसेच निमाड परिसरातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसोबतच दादाजी धामच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनाही या रेल्वेचा फायदा होणार आहे.

नवीन ट्रेनला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. या नवीन एक्सप्रेस ट्रेनमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ रेल्वे प्रवास उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button