ट्रम्प यांच्या ‘इराण करारा’मुळे कच्चे तेल कोसळले! आता भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का?

जून 15, 2026 3:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जागतिक ऊर्जा बाजारासाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची घडामोड समोर आली असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत ऐतिहासिक शांतता करार झाल्याची घोषणा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’चा सागरी मार्ग तातडीने करमुक्त आणि खुला करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. या आंतरराष्ट्रीय करारामुळे जागतिक बाजाराला मोठा दिलासा मिळाला असून कच्च्या तेलाचा भडका आता शांत झाला आहे.

petrol diesel

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या अनपेक्षित आणि वादळी निर्णयाचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला. आज सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजार उघडताच ब्रेंट क्रूड (Brent Crude) ३.२ टक्क्यांनी घसरून ८४ डॉलर प्रति बॅरलवर आले. तर यूएस क्रूड ३.७ टक्क्यांनी कोसळून ८१ डॉलर प्रति बॅरलवर आले. जर हा दर प्रति बॅरल ८० डॉलरच्या आसपास स्थिरावला, तर जागतिक अर्थव्यवस्थेवरील महागाईचे सावट दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इराणसोबतच्या कराराची घोषणा केली. त्यांनी लिहिले की, तेहरानसोबतचा करार अंतिम झाला असून सागरी वाहतुकीवरील सर्व निर्बंध उठवले जात आहेत. आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिले की, इराणसोबतचा करार अंतिम झाला असून ते अमेरिकेच्या नौदलाला नाकेबंदी उठवण्याचे आदेश देत आहेत.

जागतिक बाजारात कच्चे तेल घसरले असले, तरी त्याचा थेट आणि तातडीचा फायदा भारतीय ग्राहकांना मिळालेला नाही. २८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर भारतीय तेल कंपन्यांनी सुरुवातीचे दोन महिने आंतरराष्ट्रीय दरवाढीचा भार ग्राहकांवर टाकला नव्हता. मात्र, कंपन्यांचा तोटा प्रचंड वाढल्याने अखेर त्यांनी मे महिन्यात दरवाढ केली.

१० दिवसांत ७ रुपयांची दरवाढ:
तेल कंपन्यांनी अवघ्या १० दिवसांत (१५ मे ते २५ मे दरम्यान) पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत चार वेळा वाढ केली होती. यामुळे देशात इंधनाचे दर प्रति लिटर ७ रुपयांपेक्षा जास्त महागले होते.

किंमती कधी कमी होणार?
बाजार तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुढील काही दिवस किंवा आठवडे प्रति बॅरल ८० डॉलरच्या आसपास स्थिर राहिल्या, तर भारतीय तेल कंपन्यांचा झालेला तोटा भरून निघेल. त्यानंतर कंपन्या देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांना इंधन कपातीसाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now