जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथून एक संतापजनक घटना समोर आलीय. खाऊचे पैशांचे आमिष दाखवून एका अल्पवयीन बालिकेवर विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत चार संशयित वृद्धांना अटक केली आहे. तसेच एका १६ वर्षीय विधि संघर्षित बालकावरही कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यांना केली अटक

मनोहर रामा पाटील (वय ६५), मधुकर विश्वनाथ भारंबे (वय ६४), नारायण सोमा चौधरी (वय ५०) आणि विनायक वसंत पाटील (वय ५२), अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
असा उघड झाला प्रकार
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपींनी पीडित अल्पवयीन बालिकेला वेळोवेळी खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. बुधवारी सकाळी पीडित मुलीसोबत आरोपी दुष्कृत्य करत असताना हा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास आला. शेजाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ वरणगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि मुक्ताईनगर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असून वरणगाव पोलीस या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत. निष्पाप बालिकेवर झालेल्या या अत्याचारामुळे वरणगाव परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.











