जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्टपासून सुट्टीवर गेलेल्या पावसाने मागील दोन दिवसात जळगाव शहरासह जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाची हजेरी लावली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून कमाल आणि किमान तापमानात किंचित घट झाली आहे. गेल्या २४ तासांत जळगावात २३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

जळगावचे कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. किमान तापमानात १.२ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वातावरण काहीसे थंड राहिले.

दरम्यान, हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे. सकाळी ८.३० वाजता हवेतील सापेक्ष आर्द्रता १०० टक्के, तर सायंकाळी ५.३० वाजता ८९ टक्के नोंदवण्यात आली.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव शहर आणि परिसरात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान पुढील तीन दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पुढील आठवड्यासाठी हवामान विभागाकडून सध्या कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता नसली तरी अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.









