शिफारसपत्रासाठी 4.80 लाखांची लाच; धुळे जि.प.चा फिटर अन् एजंट जळगाव एसीबीच्या जाळ्यात

ऑगस्ट 13, 2026 1:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात लाचखोरीच्या घटना सातत्याने समोर येत असून, प्रशासकीय पारदर्शतेचे धिंडवडे निघत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. अशातच धुळे जिल्हा परिषदेचा फिटर आणि त्याच्या खासगी एजंटला तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात पकडले.

lach jpg webp

पारोळा शहरातील ‘हॉटेल ग्रीन पार्क’ येथे ही धडक कारवाई करण्यात असून पुरुषोत्तम मंगाजी वाघ (वय ५०, फिटर, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद धुळे) आणि बारकू काळू पाटील (वय ६०, सिक्युरिटी एजन्सी सुपरवायझर, देवपूर, धुळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या कारवाईने लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

काय आहे प्रकरण?

तक्रारदारासह अन्य पाच जण धुळे जिल्हा परिषदेत तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. नियमानुसार सलग ६० दिवस सेवा पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी केली जाते. ही नोंदणी आणि शिफारसपत्र मिळवून देण्यासाठी संशयितांनी प्रत्येक सुरक्षा रक्षकाकडून १ लाख ५० हजार रुपये, याप्रमाणे एकूण ७ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने यापूर्वी १ लाख रुपये दिले होते, मात्र काम न झाल्याने उर्वरित रकमेसाठी तगादा लावला गेला. अखेर ५ लाख ८० हजार रुपयांवर तडजोड झाली. यापूर्वीचे १ लाख रुपये वजा करून उर्वरित ४ लाख ८० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी संशयितांनी दर्शवली. याप्रकरणी तक्रारदाराने ११ ऑगस्ट रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. एसीबीने ११ आणि १२ ऑगस्ट रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करून पारोळा येथील हॉटेल ग्रीन पार्कमध्ये सापळा रचला.

पुरुषोत्तम वाघ याच्या सांगण्यावरून बारकू पाटील याने तक्रारदाराकडून ४ लाख ८० हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now