जळगावातील निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; तात्काळ KYC पूर्ण करा, अन्यथा..

ऑगस्ट 3, 2026 6:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयातून दरमहा निवृत्तीवेतन घेणारे राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, शिक्षक व शिक्षकेतर निवृत्तीवेतनधारक तसेच इतर राज्यातून सेवानिवृत्त होऊन जळगाव जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्वांनी आपल्या बँक खात्याचे ‘केवायसी’ (KYC) तात्काळ पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाने केले आहे.

kyc

केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास निवृत्तीवेतनाच्या वितरणात अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशाराही दिला आहे. बँकेच्या नियमानुसार प्रत्येक खातेधारकाने ठराविक कालावधीनंतर ‘केवायसी’ करणे आवश्यक असते. त्यामुळे बँक खाते अबाधित राहून सर्व बँक व्यवहार सुरळीत व सुरक्षितपणे सुरू राहतात.

मागील काही महिन्यांपासून काही निवृत्तीवेतनधारकांचे बँक खाते बंद असणे किंवा ‘केवायसी’ न केल्यामुळे त्यांचे निवृत्तीवेतन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परत येत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी संबंधित वयोवृद्ध निवृत्तीवेतनधारकांना वेळेवर निवृत्तीवेतन मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे सर्व निवृत्तीवेतनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या बँकेत जाऊन तात्काळ ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून निवृत्तीवेतन नियमितपणे मिळत राहील, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.

तसेच, निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी मृत्यू दाखल्याची प्रत जोडून त्याची माहिती तात्काळ जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा कोषागार कार्यालय, जळगाव यांना कळवावी, असेही आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now