⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर; उद्यापासून काय बंद, काय सुरू राहणार? वाचा संपूर्ण माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२१ । गर्दी आटोक्यात आणून कोरोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्य सरकारनं ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत याआधी लावलेल्या निर्बंधांमध्ये बदल करून ते अधिक कठोर केले आहेत. त्यानुसार, त्यानुसार, किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी ७ ते ११ याच वेळेत सुरू ठेवता येणार आहेत.

आठवडाभरापूर्वी संचारबंदी लागू करताना राज्य सरकारनं अनेक गोष्टींची मुभा दिली होती. विशेषत: जीवनावश्यक वस्तूची विक्री करणाऱ्या दुकानांना मोठी सवलत देण्यात आली होती. मात्र, तिथं सातत्यानं गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. त्यामुळं ‘ब्रेक द चेन’चे नियम अधिक कठोर करण्याची मागणी सरकारमधील काही मंत्र्यांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात आज रात्री ८ वाजल्यापासून नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

काय आहेत नवे नियम? काय राहणार सुरू आणि काय बंद?

राज्यात आता सर्व किराणा, भाज्यांची दुकानं, फळ विक्रेते, डेरी, बेकरी, सर्व प्रकारची खाद्य दुकानं (चिकन, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी), कृषी क्षेत्राशी निगडीत सर्व दुकानं आणि शेती संबंधिची दुकानं, पाळीव प्राण्याची खाद्य दुकानं सकाळी ७ ते सकाळी ११ अशा केवळ चार तास सुरू ठेवता येणार आहेत. वरील सर्व दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करण्याची मुभा देण्यात आली आहे.  त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाला संबंधित क्षेत्रातील परिस्थिती पाहून दुकांच्या वेळांबाबत निर्णय घेता येणार आहे.

काय राहणार बंद?

– राज्यात १ मेच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असलेले इतर कडक निर्बंध हे कायम असणार आहेत.

– राज्यातील सर्व सलून, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील

– शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स बंद राहतील

– क्रीडा संकुलं आणि स्टेडियम देखील बंद राहणार

– धार्मिक स्थळं बंदच राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांना देखील परवानगी नाही.

– विवाहासाठी केवळ २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी

– अंत्यसंस्कारासाठी केवळ २० माणसांना उपस्थित राहण्याची परवानगी

– सर्व खासगी कार्यालयं बंद राहतील