कांद्याचा विषय नक्कीच गंभीर, पण..; चांदवडच्या आंदोलनानंतर गिरीश महाजनांची महत्त्वाची अपडेट

मे 26, 2026 2:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रात कांद्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, नाशिकच्या चांदवड येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ‘क्रांती मोर्चा’ काढत मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाची गंभीर दखल घेत आता राज्य सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी एक अत्यंत महत्त्वाची दिली असून, कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उद्या नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे सांगितले.

girishM

नाशिकच्या चांदवड येथे आमदार रोहित पवार, अंबादास दानवे, हर्षवर्धन सपकाळ आणि शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज कांदा उत्पादकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनावर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी सविस्तर भाष्य केले.

या आंदोलनावरून गिरीश महाजन म्हणाले, “कांद्याचा विषय नक्कीच गंभीर आहे आणि भाव कमी असल्याने आमचा बळीराजा सध्या अडचणीत सापडला आहे, हे नाकारता येणार नाही. चांदवड येथे जे आंदोलन सुरू आहे, त्यातील काही आंदोलने ही राजकीय हेतूने प्रेरित आहेत. मात्र, असे असले तरी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अत्यंत संवेदनशील आहोत. याप्रकरणी आम्ही सातत्याने केंद्र सरकारच्या संपर्कात असून लवकरच यावर मार्ग काढला जाईल.”

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्या नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, जयकुमार रावळ यांच्यासह इतर दोन महत्त्वाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अमित शाह यांच्यासमोर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व मुद्दे, हमीभाव आणि अनुदानाचा विषय मांडला जाईल, अशी माहिती महाजन यांनी दिली.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय?
शेतकऱ्यांच्या मते, कांदा उत्पादनासाठी प्रति किलो १८ ते २० रुपये खर्च येतो. मात्र, सध्या बाजारपेठेत केवळ १२ ते १५ रुपये प्रति किलो दर दिला जात असल्याने शेतकरी मोठ्या तोट्यात आहेत. तसेच शासकीय पातळीवर कांद्याची ३,००० रुपये प्रति क्विंटल (किंवा किमान २४ रुपये प्रति किलो) या दराने खरेदी करण्यात यावी, जेणेकरून उत्पादन खर्च वजा होऊन शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे शिल्लक राहतील. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी कमी दरात कांदा विक्री केली आहे, त्या विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल १,५०० रुपये अनुदान देण्यात यावे, या मागण्यांसाठी चांदवडमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now