बातम्यामहाराष्ट्र

अखेर सरकारने शब्द पाळला; शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या १५ डिसेंबरला होणार असल्याची माहिती असून त्यापूर्वी शासनाने मोठा निर्णय घेतला. खरंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला होता. मात्र आता या अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 412 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यातील सर्वाधिक निधी हा अंबड तालुक्यासाठी 150 तर घनसावंगी तालुक्यासाठी 139 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन या सारख्या पिकांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आता शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईची मदत म्हणून जालना जिल्ह्यात 412 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील जिरायती पिकांचं 2 लाख 26 हजार 358 हेक्टर क्षेत्रावर तर 28 हजार 586 हेक्टर क्षेत्रावर फळ पिकांचं नुकसान झालं होतं. त्यानंतर कृषी विभागाने केलेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाईसाठी केलेल्या मागणीपोटी शासनाने एकूण 412 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये जिरायती पिकांसाठी 13 हजार 600, बागायतीसाठी 27 हजार रुपये तर फळ पिकांसाठी 36 हजार रूपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान मागील अनेक दिवसांपासून नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी वर्गातून ही मागणी वारंवार होत होती, अखेर निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागे महायुतीचं सरकार असताना देखील आणि विधानसभेच्या प्रचारावेळी देखील तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नव्या सरकारकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 412 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button