खाद्यतेलाच्या पॅकिंगबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता ९ ठराविक आकारमानातच मिळणार तेल

जून 16, 2026 1:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | एकीकडे खाद्यतेलाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशातच आता खाद्यतेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने एक दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बाजारात खाद्यतेल विक्रीदरम्यान ग्राहकांची मापात होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने आता खाद्यतेलाच्या पॅकिंगसाठी एकसमान मापदंड लागू केले आहेत.

oil

सरकारच्या या निर्णयामुळे कंपन्यांना आता ठराविक वजनाच्या पॅकमध्येच खाद्यतेलाची विक्री करावी लागणार आहे. यासाठी २०० मिली ते २० लिटर, अशी वजनाची नऊ परिमाणे निश्चित करण्यात आली आहेत.

नवीन नियमांनुसार, आता कंपन्यांना केवळ ९ ठराविक आकारमानातच खाद्यतेल विकता येईल. त्यात २०० मिली, ५०० मिली, १ लिटर, २ लिटर, ३ लिटर, ५ लिटर, १० लिटर, १५ लिटर आणि २० लिटर, असे आकारमान निश्चित केले आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना प्रत्येक रुपयामागे नेमके किती तेल मिळत आहे, याचा अचूक हिशोब ठेवता येईल. कंपन्यांकडून वजनात केली जाणारी छुपी घट थांबेल आणि ग्राहकांची आर्थिक बचत होईल.

यापूर्वी अनेक कंपन्या ८५० मिली, ९०० मिली किंवा ९५० मिली अशा वेगवेगळ्या आकारांच्या पॅकमध्ये खाद्यतेल विकत असल्याने ग्राहकांचा गोंधळ उडत होता. एकाच किमतीत कमी प्रमाण मिळाल्याने अनेकदा ग्राहकांची दिशाभूल होत होती. नवीन नियमामुळे या प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा आहे.

सरकारच्या या निर्णयानुसार प्रत्येक पॅकवर त्याचे वजन आणि आकार स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच लिटरसोबत आवश्यकतेनुसार वजनाची माहितीही देणे बंधनकारक राहणार आहे, या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी खाद्यतेल उत्पादक कंपन्या आणि पॅकिंग करणाऱ्या संस्थांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर संबंधित कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now