
जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यातील पाल येथे गांजाची विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करणाऱ्या संशयितावर रावेर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका दुमजली घरावर छापा टाकून ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची अंदाजे किंमत १ लाख ६५ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी मेहरबान जहाँगीर तडवी (वय ३६, रा. पाल, ता. रावेर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन यावर प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. रावेर पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मेहरबान जहाँगीर तडवी यांने स्वतःच्या मालकीच्या दुमजली घरात विक्रीच्या उद्देशाने गांजा साठवून ठेवला आहे.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून रावेर पोलिसांनी संशयिताच्या घरावर छापा टाकला. यावेळी घराच्या प्रवेशद्वारासमोरील जिन्याजवळील विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला ३ किलो २५० ग्रॅम वजनाचा गांजा, अंदाजे १ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचा, पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करून संशयिताला ताब्यात घेतले.या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ तथा जळगाव परिमंडळाचे अतिरिक्त कार्यभार असलेले अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक अमोल कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोहेकॉ ईश्वर चव्हाण, पोहेकॉ विशाल पाटील, पोहेकॉ प्रमोद पाटील, पोहेकॉ सेतुका तडवी, पोहेकॉ इस्माईल तडवी, पोहेकॉ विकार शेख आणि पोहेकॉ श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.





