जळगाव जिल्हाराजकारण

जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! मंत्री गिरीश महाजनांची बिनविरोध निवड निश्चित

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. जामनेर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेले राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माघारीच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवार तुकाराम विठोबा निकम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महाजन यांना पाठिंबा दिला. त्यामुळे जामनेर मतदारसंघातून महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जामनेर मतदारसंघातून मंत्री गिरीश महाजन यांच्यासह रघुनाथ पाटील आणि तुकाराम विठोबा निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

दरम्यान, छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता. या निर्णयाला आव्हान देत पाटील यांनी नाशिक येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात हरकत दाखल केली होती. मात्र, तेथेही त्यांची हरकत फेटाळण्यात आली. त्यामुळे निवडणूक रिंगणात गिरीश महाजन आणि तुकाराम निकम हे दोन उमेदवार उरले होते.

आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी तुकाराम विठोबा निकम यांनी आपला अर्ज मागे घेत गिरीश महाजन यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे जामनेर मतदारसंघात महाजन यांच्याविरोधात अन्य उमेदवार शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button