
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी १६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विशेष मोहिमेत दारू माफिया, जुगारी, गांजा तस्कर, सराईत गुन्हेगार तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकाच दिवसात तब्बल ३५ लाख ७२ हजार ९३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दंडही वसूल करण्यात आला आहे.
हातभट्टी, जुगार अन् गांजा तस्करांवर कारवाई
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पहाटेपासूनच विविध ठिकाणी धाडी टाकल्या. अवैध गावठी हातभट्टीप्रकरणी १२४ गुन्हे दाखल करून १२० आरोपींवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ हजार ७२५ लिटर दारू व रसायन नष्ट करण्यात आले असून २० लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
देशी-विदेशी दारू विक्रीप्रकरणी १२ गुन्हे, तर जुगाराचे ४६ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. या कारवाईतही मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंमली पदार्थविरोधी कारवाईत ३ किलो २५० ग्रॅम गांजा, अंदाजे १ लाख ६२ हजार रुपये किमतीचा, जप्त करण्यात आला असून ११ जणांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय तलवारी बाळगणाऱ्या दोघांवरही कारवाई करण्यात आली.
वाहतूक नियम मोडणाऱ्यांनाही दणका
रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या ८७ जणांवर, विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या १३३ जणांवर, तर महामार्गावर अनधिकृत पार्किंग करणाऱ्या ६१ जणांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत वाहतूक नियमभंगाच्या एकूण १ हजार ५७ कारवाया करण्यात आल्या असून ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या ७३ जणांवरही पोलिसांनी कारवाई केली.
१७ बेपत्ता व्यक्तींचा शोध; ४२ मोबाईल मिळवून दिले
‘ऑपरेशन ऑल आऊट’दरम्यान गुन्हेगारीविरोधी कारवाईसोबतच पोलिसांनी सामाजिक बांधिलकीही जपली. मोहिमेदरम्यान १७ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. यामध्ये ५ महिला, ७ पुरुष आणि ५ मुलींचा समावेश आहे.तसेच CEIR पोर्टलच्या माध्यमातून चोरीला गेलेले ४२ मोबाईल शोधून काढण्यात आले आणि ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
५०७ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती
गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी एकाच रात्रीत ५०७ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ८ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय ३७६ समन्स आणि १६१ वॉरंटची बजावणी करण्यात आली.पानटपऱ्यांवर कोटपा कायद्यान्वये १०० गुन्हे दाखल करून २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच १९० भंगार दुकाने आणि १८० हॉटेल-लॉजची तपासणी करण्यात आली.
गुन्हेगारीला थारा नाही
जळगाव जिल्ह्यात अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना कोणताही थारा दिला जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा धडक मोहिमा यापुढेही सातत्याने राबवल्या जातील, असा इशारा जळगाव जिल्हा पोलीस दलाने दिला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव) अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी व अंमलदारांनी केली.





