
जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील समर्थ कॉलनीत घराचे कडी-कोयंडे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला रहिवाशांनी रंगेहात पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेत १७ हजार रुपयांची रोकड आणि १ हजार ५०० रुपये किमतीच्या बेंटेक्सच्या वस्तू असा एकूण १८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे समोर आले आहे.
समर्थ कॉलनी परिसरातील प्रवीण दिनकर मोरे (वय ३९) यांच्या घराला चोरट्याने लक्ष्य केले. घराचा कडी-कोयंडा तोडून त्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील १७ हजार रुपयांची रोकड आणि बेंटेक्सच्या वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरात चोरी होत असल्याची बाब परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आली.
यानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चोरट्याला पकडले. त्याला चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
संशयिताची ओळख पटली
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताची चौकशी केली असता त्याचे नाव ईश्वर सुकदेव पवार (रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) असल्याचे निष्पन्न झाले. त्याने यापूर्वीही चोरीच्या घटना केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पाचोरा शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. रात्रीच्या वेळी घर बंद ठेवणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.





