
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या तिन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात भाजपच्या माजी महापौर जयश्री महाजन, शिवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील आणि भाजपचे प्रभाकर सोनवणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक लक्षवेधी ठरली होती.
मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात भाजपच्या जयश्री महाजन आणि प्रभाकर सोनवणे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. दुसरीकडे, शिवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्याविरोधातील तिन्ही उमेदवार निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. परिणामी, जळगाव तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली.





