जळगाव जिल्हागुन्हे

शिलाई मशीनचे आमिष दाखवून जळगाव तालुक्यातील ९० महिलांना लाखोंचा गंडा ; दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव तालुक्यातील तब्बल ९० महिलांची ३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ३५ टक्के रक्कम भरल्यानंतर शिलाई मशीन देण्याचे आमिष दाखवून महिलांकडून पैसे घेण्यात आले. मात्र, पैसे घेतल्यानंतर मशीन न दिल्याने या प्रकरणातील ‘बनवाबनवी’ उघडकीस आली आहे. या प्रकरणी सपना संजय कोळी आणि संजय कोळी (सोनवणे), दोघे रा. देवकर नगर, यांच्याविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भादली गावात ३५ टक्के रक्कम भरल्यानंतर फुल शटल मोटारसहित शिलाई मशीन मिळेल, अशा आशयाचे पॅम्पलेट लावण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये सपना कोळी व संजय कोळी हे दोघे भादली गावात गेले आणि त्यांनी महिलांना या योजनेची माहिती दिली.

गावातील माधुरी भागवत मिस्तरी (५०) यांना शिलाई मशीन मिळाल्याचे सांगत संशयित आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला. ‘तुम्हाला ज्या पद्धतीने मशीन मिळाली, त्याच पद्धतीने तुमच्या ओळखीतील महिलांकडून पैसे व अर्ज जमा करून द्या. पैसे मिळाल्यानंतर इतर महिलांनाही मशीन देण्यात येतील,’ असे त्यांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार माधुरी मिस्तरी यांनी त्यांच्या ओळखीतील व नातेवाईकांमधील तब्बल ९० महिलांना या योजनेची माहिती दिली. या महिलांकडून आरोपींना ऑनलाइन तसेच रोख स्वरूपात एकूण ३ लाख १० हजार रुपये देण्यात आले. मात्र, पैसे भरूनही एकाही महिलेला शिलाई मशीन मिळाली नाही.

पैसे जमा केल्यानंतर साडेतीन महिन्यांच्या आत शिलाई मशीन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, ठरलेली मुदत उलटून गेल्यानंतरही महिलांना मशीन मिळाल्या नाहीत. यामुळे माधुरी मिस्तरी यांनी सपना व संजय कोळी यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून वारंवार पाठपुरावा केला.मात्र, मशीन देण्याऐवजी टाळाटाळ करण्यात आली. पैसे परत मागण्यासाठी पाठपुरावा केल्यावर शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

मशीन मिळाली नाही आणि दिलेले पैसेही परत करण्यात आले नाहीत. अखेर माधुरी मिस्तरी यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून सपना कोळी आणि संजय कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button