⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024

धानोरा जिल्हा परिषद शिक्षकाचा निष्काळजीपणा; पॉझिटिव्ह असून शाळेत हजेरी

0
corona

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । धानोरा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील एक शिक्षक कोरोना बाधित असूनही गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शाळेत येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

कोरोना मुळे प्राथमिक शाळा बंद असल्या तरी ही शिक्षकांना शाळेत हजेरी लावणे क्रमप्राप्त आहे. धानोरा येथील जि.प.शाळेत ही शाळेच्या इतर शैक्षणिक कामानिमित्त शाळेत मुख्याध्यापक सहित आठ ते दहा शिक्षक हजेरी लावतात. सर्व शिक्षकांना वेळोवेळी कोविड19 ची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले असूनही धानोरा शाळेतील एका शिक्षकाने आठ ते दहा दिवसांपासून टेस्ट करूनसुद्धा रिपोर्ट बाबत गंभीर्य लक्षात न घेता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असून देखील बाहेरगावाहून येजा सुरूच ठेवून शाळेतील शिक्षकांसह ग्रामस्थानाही संसर्गाचा धोका निर्माण केला आहे.

शिक्षकाची बेपरवाईने खळबळ

धानोरा जि.प.शाळेतील शिक्षक कोरोना बाधित असूनसुद्धा गेल्या काही दिवसांपासून शाळेत येऊन इतर शिक्षकांच्या संपर्कात येत राहिले. त्यांच्या या बेपरवाई कारभारामुळे शाळेतील शिक्षकांसहित ग्रामस्थांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस पाटलांची सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

धानोरा जि. प. शाळेत एक शिक्षक कोरोना बाधित असल्याचे गावातील पोलिस पाटील दिनेश पाटील यांना त्यांच्या खास सूत्रांकडून माहिती मिळाली होती. पोलिस पाटील सकाळी शाळेकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना कोरोना बाधित शिक्षक शाळेत प्रवेश करीत असताना दिसले. पाटील यांनी त्या शिक्षकास समज देत विचारणा केली असता शिक्षकाने त्यांना मला पॉझिटिव्ह बाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने मला काहीच त्रास जाणवत नसल्याचे त्या शिक्षकाने अनभिज्ञ पणे उत्तरे दिली. पोलिस पाटील यांनी त्या शिक्षकास घरीच विलगिकरण होण्याचा सल्ला देत घरी पाठवले.

महापौर, उपमहापौर निवडीसंदर्भात उद्या महत्वपूर्ण बैठक

0
jalgaon mayor

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । जळगाव शहर मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असून अनेक इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, यासंदर्भात उद्या दि.१४ रोजी महत्वपूर्ण बैठक असल्याची माहिती माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली.

 

जळगाव शहर मनपातील महापौर भारती सोनवणे यांचा कार्यकाळ दि.१८ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठीकडे लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. भाजपातून ज्योती चव्हाण, प्रतिभा कापसे यांचे नाव आघाडीवर असून उज्ज्वला बेंडाळे यांचेही नाव चर्चेत आहे. दरम्यान, विद्यमान महापौर सौ.भारती सोनवणे यांनाच मुदतवाढ द्यावी अशी मागणी देखील जोर धरत असून पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

 

जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ.गिरीष महाजन हे शनिवारी जळगावात आले असून उद्या रविवारी महापौर निवडीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक असल्याचे त्यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले. आ.महाजन हे जळगावातील संपर्क कार्यालयात आले असता इच्छुकांसह इतर नगरसेवकांनी त्यांची भेट घेत चर्चा केली.

धरणगावातील नामांकित वकिलाचे क्रिकेट खेळतांना निधन

0
dilip raotole

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । धरणगाव येथील नामांकित वकिलाचा सकाळी क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. ॲड. दिलीप रावतोळे असे मृत वकिलाचे नाव आहे.

ॲड. दिलीप रावतोळे हे शहरातील सर्व वकील मित्रांसोबत सकाळी महात्मा फुले हायस्कूलच्या मैदानावर क्रिकेट खेळायला जात असे. शनिवारीसुद्धा ते नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळायला गेले होते. त्यामध्ये बॅटिंग करत असताना रावतोळे अचानक खाली कोसळले. त्यानंतर सर्व मित्रांनी त्यांना धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. त्यानंतर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश बोरसे यांनी ॲड. दिलीप रावतोळे यांना तपासले असता, हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.

एलआयसीचे विमा विकास अधिकारी गणेश रावतोळे यांचे लहान बंधू व गुड शेपर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या चैताली रावतोळे यांचे ते पती होते. दिलीप रावतोळे यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण धरणगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील

0
dd6a668c e323 401c 9ee4 861bee5c42cd

जळगाव लाईव्ह न्युज | १३ मार्च २०२१ | येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते जळगाव येथील माजी महिला महानगराध्यक्षा कल्पना पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांच्या बांधकामांसाठी २८ कोटीचा निधी मंजूर

0
kishor patil

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । पाचोरा- भडगाव तालुक्यातील ८० किलोमीटरचा रस्त्यांसह १ लहान पुलाच्या कामास सुमारे २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. यामुळे दळण वळणाची सोय अधिक जलद होणार असून यामुळे मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.  

ते आपल्या निवासस्थानी “शिवालय” येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. नुकत्याच संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे एवढा निधी खेचून आणण्यात आपल्याला यश आले असून याकामी आपल्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजीत पवार, नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार्य मिळाले असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, मुकुंद  बिल्दीकर, तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे, डॉ. हेमराज पाटील उपस्थित होते. मंजुरी मिळालेल्या कामात प्रामुख्याने पिंप्रीहाट रामा – सावदा – गुढे – वडाळी १२.५ किलोमीटरचा २.७५ कोटी रुपयांचा रस्ता, आर्वे – शिरूड – तरवाडे – पळासखेडे मध्ये लहान पुलांच्या बांधकामासाठी ५० लक्ष रुपये, भडगाव – वाक – पळासखेडा दरम्यान ३ कोटी रुपायांचा १२ किलोमीटर चा रस्ता, वाडे – गोंडगाव – कनाशी – भडगाव दरम्यान सुमारे ३ कोटी ४० लक्ष रुपयांचा ५ किलोमीटरचा रस्ता, नांद्रा – माहेजी (कुरंगी फाटा ते माहेजी गावातील देवी मंदिरा पर्यंतचा रस्ता २ कोटी रुपयांचा रस्ता, नगरदेवळा – नेरी – भामरे दरम्यान १०किलोमीटरचा १ कोटी ६० लाख रुपयांचा रस्ता, लोहारी ते आंबेबडगाव दरम्यान ५ किलोमीटरचा २ कोटी ५० लाखांचा रस्ता, चुंचाळे ते विष्णुनगर दरम्यान ६ किलोमीटरचा सुमारे ३ कोटी रुपायांचा रस्ता, नगरदेवळा ते निपाणे दरम्यान ६ किलोमीटरचा १ कोटी ५० लाख रुपयांचा रस्ता, गाळण ते चिंचखेडा दरम्यान ५ किलोमीटरचा सुमारे २कोटी २५ लाख रुपयांचा रस्ता, वरसाडे ते डोकलखेडा दरम्यान ५  किलोमीटरचा १ कोटी ८०‌ लाख रुपायांचा रस्ता, तर लासगाव ते बांबरुड दरम्यान ५ किलोमीटरचा २ कोटी ५० लाख रुपयांच्या कामांचा समावेश असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. अशा २८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असुन लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

बिग ब्रेकिंग : जळगाव मनपाचे बँक खाते सील; महसूल विभागाने केली कारवाई

0
jalgaon-manapa

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । चेतन वाणी । शहर महानगरपालिकेचे बँक खाते महसूल विभागाने सील केले आहेत. जळगाव शहर मनपाकडे अनेक वर्षापासून १३.२५ कोटी थकीत असल्याने कार्यवाही करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली.

नेहमी काही न काही कारणाने चर्चेत राहणाऱ्या जळगाव मनपावर पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे. महसूल विभागाच्या थकीत असलेल्या १३.२५ कोटी रकमेमुळे महसूल विभागाने मनपाची बँक खाती गोठवली आहेत. ऐन कोरोनाच्या काळात कारवाई झाल्याने अनेक अडचणी उभ्या राहणार आहेत. जळगाव उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याबाबत दुजोरा दिला असून जळगाव मनपाच नव्हे इतर देखील काही विभाग आणि कार्यालयांची खाती गोठवली असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात गृहविलगीकरणाचे नियम पुन्हा कठोर ; जाणून घ्या काय आहे नियम

0
hoom quarantine rules stricter in jalgaon

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी गृहविलगीकरणाचे नियम पुन्हा कठोर केले आहेत. ६० वर्षांवरील ज्येष्ठ अथवा अन्य आजार असलेल्या नागरिकांना गृहविलगीकरणाची परवानगी नसेल. 

जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या अचानक वाढू लागली आहे. वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्ह्यात बहुतांश भागात जनता कॅर्फ्यू लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरात आढळून येत आहे. शहरात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवसाचा जनता कॅर्फ्यू लावण्यात आला आहे. तरी देखील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

गृहविलगीकरणाची मान्यता अपवादात्मक स्थितीत, लक्षणे नसलेल्या व अतिसौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनाच मिळू शकेल. त्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतील. हे निकष पूर्ण केले जात नसतील तर प्रत्येक रुग्णाने कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल होणे गरजेचे आहे.

गृह विलगीकरणासाठीचे नियम 

– लक्षणे सौम्य, अतिसौम्य असल्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असावे

– विहित नमुन्यात रुग्णाला त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या नावाचा उल्लेख असावा

– संबंधित रुग्णाच्या घरी एकच कुटुंब असावे

– गृहविलगीकरणात दोन स्वतंत्र शौचालय, बाथरुमसह चार खोल्यांचे घर असावे

– घरी रात्रंदिवस, २४ तास काळजी घेणारी व्यक्ती असावी

– या सर्व सुविधा आहेत की नाही, याची खातरजमा तलाठी, ग्रामसेवक, नगरपालिका व मनपा स्तरावर संबंधित अधिकाऱ्यांनी करावी

 

– रुग्णाने स्वतःचे गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्र (परिशिष्ट-1) भरुन द्यावे व सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. प्रतिज्ञापत्र दिल्यांनतर सदरील व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.

-वर नमूद सर्व अटी व शर्तीचे पालन करणाऱ्या व्यक्तींना जळगांव महानगरपालिका कार्यक्षेत्रात आयुक्त, मनपा जळगांव तथा Incident Commander यांनी नेमून दिलेला अधिकारी परवानगी देईल. तसेच उव्वरित जळगांव जिल्हयाकरिता संबंधित उपविभागीय अधिकारी तथा Incident Commander यांनी गृह विलगीकरणासाठी तसेच गृह उपचारासाठी परवानगी देण्याची कार्यवाही करावी.

जि.प.मध्ये कोरोनाचा धोका वाढतोय ; पुन्हा दोन कर्मचारी बाधित

0
jalgaon-zp-building

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून हाॅटस्पाॅट ठरलेल्या शहरातील जिल्हा परिषदेच्या दाेन्ही इमारतीमध्ये दरराेज नवनवीन रूग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी बांधकाम विभागात आणखी दाेन कर्मचाऱ्यांना काेराेना संसर्ग झाल्याने या विभागाला प्रशासनाकडून तातडीने कुलूप लावण्यात आले.

मार्च अखेर असल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या कंत्राटदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची यात्रा भरलेली असते. गेल्या दाेन महिन्यापासून या विभागात रात्री उशिरापर्यंत कंत्राटदारांची गर्दी असते. टेबलभोवती कर्मचाऱ्यासोबत ठेकेदार फाईल मार्गी लावण्यासाठी तासंतास बसून असतात. काेराेनाचा संसर्ग वाढला असतांना बांधकाम विभागातील वाढत्या गर्दीचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला होता. प्रशासनाने निर्बंध लावूनही ही गर्दी कमी हाेत नव्हती. शेवटी शुक्रवारी दाेन कर्मचारी काेराेना संक्रमित झाल्याचे तपासणीमध्ये दिसून आल्यानंतर या विभागाला तत्काळ कुलूप लावण्यात आले.

विभागातील इतर कर्मचाऱ्यांना क्वाॅरंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या. मार्च अखेर असल्याने बहुतांश सदस्य आणि ठेकेदारांची कामे याच विभागाशी निगडीत होती. सकाळीच हा विभाग बंद करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने काहीशी गर्दी ओसरली होती.जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या कार्यालय कुलूप लावून बंद केलेले आहे.

दुचाकी-ट्रकची समोरासमोर धडक ; तरुण ठार

0
accident logo

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ ।  मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळ दुचाकी व ट्रकची धडक होऊन झालेल्या अपघातात २३ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.

शेमळदे येथील अश्विन रवींद्र भालेराव (वय २३) हा दुचाकी (एमएच- १९, सीके- ८१३९)ने मुक्ताईनगरडे येत होता. खामखेडा पुलाजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (टीएस- १६, यूसी- ४७१७)ने त्यास धडक दिली. या अपघातात अश्विन भालेराव गंभीर जखमी झाला.

जळगाव येथे उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. मृत अश्विन हा मुक्ताईनगर येथे बी. एसस्सी.च्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होता. त्याचे वडील आर. जी. भालेराव हे रावेर पंचायत समिती, तर आई अंगणवाडी सेविका आहे.