⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

धानोरा जिल्हा परिषद शिक्षकाचा निष्काळजीपणा; पॉझिटिव्ह असून शाळेत हजेरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । धानोरा येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील एक शिक्षक कोरोना बाधित असूनही गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शाळेत येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

कोरोना मुळे प्राथमिक शाळा बंद असल्या तरी ही शिक्षकांना शाळेत हजेरी लावणे क्रमप्राप्त आहे. धानोरा येथील जि.प.शाळेत ही शाळेच्या इतर शैक्षणिक कामानिमित्त शाळेत मुख्याध्यापक सहित आठ ते दहा शिक्षक हजेरी लावतात. सर्व शिक्षकांना वेळोवेळी कोविड19 ची टेस्ट करणे बंधनकारक करण्यात आले असूनही धानोरा शाळेतील एका शिक्षकाने आठ ते दहा दिवसांपासून टेस्ट करूनसुद्धा रिपोर्ट बाबत गंभीर्य लक्षात न घेता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असून देखील बाहेरगावाहून येजा सुरूच ठेवून शाळेतील शिक्षकांसह ग्रामस्थानाही संसर्गाचा धोका निर्माण केला आहे.

शिक्षकाची बेपरवाईने खळबळ

धानोरा जि.प.शाळेतील शिक्षक कोरोना बाधित असूनसुद्धा गेल्या काही दिवसांपासून शाळेत येऊन इतर शिक्षकांच्या संपर्कात येत राहिले. त्यांच्या या बेपरवाई कारभारामुळे शाळेतील शिक्षकांसहित ग्रामस्थांना कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस पाटलांची सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

धानोरा जि. प. शाळेत एक शिक्षक कोरोना बाधित असल्याचे गावातील पोलिस पाटील दिनेश पाटील यांना त्यांच्या खास सूत्रांकडून माहिती मिळाली होती. पोलिस पाटील सकाळी शाळेकडे फेरफटका मारायला गेले असता त्यांना कोरोना बाधित शिक्षक शाळेत प्रवेश करीत असताना दिसले. पाटील यांनी त्या शिक्षकास समज देत विचारणा केली असता शिक्षकाने त्यांना मला पॉझिटिव्ह बाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याने मला काहीच त्रास जाणवत नसल्याचे त्या शिक्षकाने अनभिज्ञ पणे उत्तरे दिली. पोलिस पाटील यांनी त्या शिक्षकास घरीच विलगिकरण होण्याचा सल्ला देत घरी पाठवले.