⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जि.प.मध्ये कोरोनाचा धोका वाढतोय ; पुन्हा दोन कर्मचारी बाधित

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून हाॅटस्पाॅट ठरलेल्या शहरातील जिल्हा परिषदेच्या दाेन्ही इमारतीमध्ये दरराेज नवनवीन रूग्णांची संख्या वाढत आहे. शुक्रवारी बांधकाम विभागात आणखी दाेन कर्मचाऱ्यांना काेराेना संसर्ग झाल्याने या विभागाला प्रशासनाकडून तातडीने कुलूप लावण्यात आले.

मार्च अखेर असल्याने जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सध्या कंत्राटदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची यात्रा भरलेली असते. गेल्या दाेन महिन्यापासून या विभागात रात्री उशिरापर्यंत कंत्राटदारांची गर्दी असते. टेबलभोवती कर्मचाऱ्यासोबत ठेकेदार फाईल मार्गी लावण्यासाठी तासंतास बसून असतात. काेराेनाचा संसर्ग वाढला असतांना बांधकाम विभागातील वाढत्या गर्दीचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला होता. प्रशासनाने निर्बंध लावूनही ही गर्दी कमी हाेत नव्हती. शेवटी शुक्रवारी दाेन कर्मचारी काेराेना संक्रमित झाल्याचे तपासणीमध्ये दिसून आल्यानंतर या विभागाला तत्काळ कुलूप लावण्यात आले.

विभागातील इतर कर्मचाऱ्यांना क्वाॅरंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आल्या. मार्च अखेर असल्याने बहुतांश सदस्य आणि ठेकेदारांची कामे याच विभागाशी निगडीत होती. सकाळीच हा विभाग बंद करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने काहीशी गर्दी ओसरली होती.जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाच्या कार्यालय कुलूप लावून बंद केलेले आहे.