जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२१ । जळगाव शहर मनपाच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात येत असून अनेक इच्छुकांनी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, यासंदर्भात उद्या दि.१४ रोजी महत्वपूर्ण बैठक असल्याची माहिती माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना दिली.
जळगाव शहर मनपातील महापौर भारती सोनवणे यांचा कार्यकाळ दि.१८ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठीकडे लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. भाजपातून ज्योती चव्हाण, प्रतिभा कापसे यांचे नाव आघाडीवर असून उज्ज्वला बेंडाळे यांचेही नाव चर्चेत आहे. दरम्यान, विद्यमान महापौर सौ.भारती सोनवणे यांनाच मुदतवाढ द्यावी अशी मागणी देखील जोर धरत असून पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.
जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ.गिरीष महाजन हे शनिवारी जळगावात आले असून उद्या रविवारी महापौर निवडीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक असल्याचे त्यांनी जळगाव लाईव्ह न्यूजशी बोलताना सांगितले. आ.महाजन हे जळगावातील संपर्क कार्यालयात आले असता इच्छुकांसह इतर नगरसेवकांनी त्यांची भेट घेत चर्चा केली.